चाकूच्या धाकावर १८ लाख लुटले

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर सहा दरोडेखोरांनी एका दुचाकीचा पाठलाग करून चाकूच्या धाकावर १८ लाख लुटले. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सिव्हिल लाईन्समधील डीआरडीओ अधिकारी निवासी वसाहतीजवळ घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. आरोपींचा शोध सुरू आहे.

मानेवाडा बेसा मार्गावर ब्रिंक्स सव्‍‌र्हिसेस कंपनी आहे. या कंपनीकडून उद्योजक, व्यापारी, दुकानदारांचे पैसे बँकेत जमा करण्यात येतात. कंपनीत श्रीकांत  इंगळे रा. सरईपेठ, इमामवाडा व सतीश धांडे रा. दिघोरी हे काम करतात.

नेहमीप्रमाणे दोघांनी १२ व्यापाऱ्यांकडून पैसे जमा केले. त्यानंतर दोघे शंकरनगर चौकातील एलआयसी कार्यालयात गेले. त्या ठिकाणाहून निघाले तेव्हा त्यांच्याकडे सुमारे १८ लाखांची रोख होती. एमएच-३१,बीसी- ५०४४ या क्रमांकाच्या दुचाकीने अ‍ॅक्सिस बँकेत जमा करायला जात होते. दुचाकी श्रीकांत चालवत होता तर रोख रकमेची पिशवी सतीश याच्या हातात होती. देशपांडे सभागृह परिसरात मोपेडवर आलेल्या दरोडेखोरांनी दुचाकीला लाथ मारली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने श्रीकांत व सतीश खाली पडले. दरोडेखोरांनी दोघांना मारहाण केली.

चाकूचा धाक दाखवून सतीश याच्या हातातील पिशवी हिसकावली व पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनीता साहू, सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजद्वारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.