महापालिकेत ‘लोटागोटा’ आंदोलन; विभागीय आयुक्तांना निवेदन

नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील विविध भागातील अतिक्रमित धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईला दिवसागणिक विरोध वाढत आहे. नागरिकांच्या विरोधाचे सूर आणखी बुलंद करताना विविध राजकीय पक्षही या लढय़ात सहभागी झाले आहेत. भाजप नेत्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या धार्मिक स्थळ बचाव कृती समितीतर्फे बुधवारी शहरात सहा ठिकाणी मंदिरांच्या समर्थनार्थ महाआरती करण्यात आली.  या महाआरतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि त्या त्या परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महापालिकेत लोकजागृती मोर्चातर्फे लोटागोटा आंदोलन करण्यात आले.

शहरातील १५०४ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवण्यात आल्यानंतर आतापर्यंत महापालिकेने २०७ धार्मिक स्थळे हटवली आहेत. त्यात १९२ मंदिरे, १० बुद्धविहार आणि ५ मशीदचा समावेश आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने १६५ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात शहरातील विविध झोनमधील मंदिरांमध्ये महाआरती  करण्यात आली.

यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष  आमदार सुधाकर कोहळे, आमदार मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह विविध भागातील नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते.

ही तर भाजपची नौटंकी -पवार

धार्मिक स्थळावरील कारवाईच्या विरोधात भाजप नगरसेवक करीत असलेले आंदोलन ही नौटंकी आहे, अशी टीका जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.  शहरातील ३०० धार्मिक स्थळांचे अनाधिकृत बांधकाम काढून टाकल्यानंतर आता भाजपचे नगरसेवक मंदिर बचाव योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये फक्त राजकारण आहे. भाजप सत्तेत असलेल्या महापालिकेनेच अनाधिकृत धार्मिक स्थळांची यादी न्यायालयाला दिली आता त्याच पक्षाचे नगरसेवक आता मंदिर वाचवण्यासाठी चढाओढ करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे मंदिर वाचवण्यासाठी ही धावपळ आहे.  महापालिका व राज्यसरकार दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असूनही २०१४ ते २०१८ पर्यंत अनाधिकृत धार्मिक स्थळे अधिकृत करण्याचा कोणताही निर्णय भाजपने घेतला नाही. त्यामुळे आता होत असलेला विरोध म्हणजे शुद्ध राजकारण आहे आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न भाजपचे नगरसेवक व प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री करत आहेत. महापालिकेच्या कामात व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा अवमान केल्यामुळे भाजप नगरसेवक दहा(द)प्रमाणे अपात्र ठरत असल्यामुळे महापालिकेने त्याचे सभासदत्त्व ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी पवार यांनी केली. पत्रकार परिषदेला संघटनेचे अरुण वनकर, विजय शिंदे, अविनाश शेरेकर आदी उपस्थित होते.

दगडाला शेंदूर अन् भजनाचा गजर

लोकजागृती मोर्चाच्यावतीने अ‍ॅड. रमन सेनाड आणि मुन्ना महाजन यांच्या नेतृत्वात महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयात लोटागोटा आंदोलन करण्यात आले. या मंडळींनी एका दगडाला शेंदूर लावत पूजा केली आणि भजनाचा गजर करत कारवाईचा निषेध केला. यावेळी बुद्धवंदनेचे सामूहिक पठन व भीमगीते सादर करण्यात आली. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली. प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करून परिसर दणाणून सोडला. पोलिसांना न जुमानता लोकमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी आयुक्तांना निवेदन देऊन कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब देसाई, भगवानदास राठी, नंदूजी घरे, अ‍ॅड. अविनाश तेलंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी संदीप जोशी म्हणाले, महापालिका कारवाई करत असलेल्या मंदिरांची यादी चुकीची आहे. त्यात दुरुस्ती करावी आणि जी मंदिरे रस्त्यावर नाहीत, ती तोडू नये. न्यायालयात या विरोधात लढ देणार असून या विषयावर विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शस्त्र दाखवून कारवाई रोखण्याचा प्रयत्न

बुधवारी धावडे मोहल्ल्यातील धार्मिक स्थळ पाडण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण पथक पोहोचले असता त्या ठिकाणी कारवाईला विरोध करण्यात आला. पोलिसांचा मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त असताना एका युवकाने शस्त्र दाखवून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतरही नागरिकांनी ठिय्या आंदोलन केल्याने महापालिकेचे पथक परत गेले. केडीके महाविद्यालय परिसरातही विरोध करून कारवाई थांबवण्यात आली.

मून यांची याचिका

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका व नासूप्रने अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावत असून रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे स्थळे वगळता इतर धार्मिक स्थळांवर कारवाई करू नये, अशी विनंती करणारी याचिका जनार्दन मून यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. या याचिकेवर उद्या गुरुवारी सुनावणी होईल.