विद्यार्थ्यांचे लक्ष नव्या सरकारकडे; मनुष्यबळाचीही वानवा

राजेश्वर ठाकरे, नागपूर</strong>

ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी आणि उच्च शिक्षणासाठी परदेशात जाता यावे, यासाठी महात्मा जोतीराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. परंतु ही संस्था अद्याप निधी आणि मनुष्यबळाच्या प्रतीक्षेतच आहे. या दोन्ही गोष्टी मिळाल्याशिवाय संस्थेला पुढील सत्राकरिता सवलतीच्या योजना सुरू करणे अशक्य  आहे.

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाठी सवलतीच्या योजना सुरू करता याव्या म्हणून सारथीच्या धर्तीवर महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यात आली. या संस्थेतर्फे राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी संस्था आहे. मराठा व कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्था आहे. त्याच धर्तीवर महात्मा जोतीराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी या संस्थेची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे. या संस्थेचे कार्यालय पुण्यात आहे. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेसाठी निधीची तरतूद, संस्थेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय या संस्थेच्या कारभाराला सुरुवात होणार नाही. बार्टी आणि सारथीमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी साधारणत: फेब्रुवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाते. राज्य सकारने तातडीने निधी उपलब्ध केल्यास महाज्योतीदेखील फेब्रुवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध  करू शकेल आणि विद्यार्थ्यांना चालू सत्रापासून त्याच्या योजनांचा लाभ घेता येऊ शकेल.

महाज्योतीमुळे महाराष्ट्रातील ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील एक हजार विद्यार्थ्यांना दिल्लीत स्पर्धा परीक्षेसाठी शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि  इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना मदत करण्यासाठी ‘महाज्योती’च्या माध्यमातून यूपीएससीच्या तयारीसाठी ओबीसी प्रवर्गातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना दिल्लीत पाठवण्याची योजना आहे. उच्च शिक्षण आणि परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, यूपीएससी, एमपीएसी, बँकिंग, एसएससी, एमपीएससी, एसएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या कोचिंगसाठी निधी उपलब्ध करण्यावर महाज्योतीचा भर राहणार आहे, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘महाज्योती’ संस्था स्थापनेचा उद्देश

ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून बार्टीच्या धर्तीवर संस्था सुरू करण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने महाज्योती स्थापन केली.

पुणे, नागपूर, बुलढाणा येथे कार्यालय

महाज्योती कार्यान्वित झाल्यानंतर ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना दिल्लीत जाऊन यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आर्थिक मदत मिळू शकणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने कठीण परिस्थितीत दिल्लीत राहून तयारी करावी लागत आहे. या संस्थेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून पुणे, नागपूर आणि बुलढाणा येथे विभागीय कार्यालय प्रस्तावित आहेत.

महाज्योती ही समाजातील मोठय़ा वर्गाला दिलासा देणारी संस्था आहे. आमच्या सरकारने संस्था स्थापन केली. विद्यमान सरकारने तातडीने निधीची तरतूद करावी. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. जेणे करून संस्था विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू करू शकेल.

– डॉ. संजय कुटे, माजी मंत्री, ओबीसी कल्याण विभाग.