लहान दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची चणचण

नागपूर : दिवसेंदिवस  करोनाचे नवीन रुग्ण सापडत असल्याने तो भाग रेड झोन घोषित होत आहे. याचा फटका मुख्य किराणा बाजाराला बसला असून  चोहीबाजूने रेड झोनमध्ये अडकल्याने विक्रेत्यांची कोंडी झाली आहे. येथे पोहोचता येत नसल्याने लहान दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची चणचण जाणवायला लागली आहे.

शहरातील बहुतांश चिल्लर किराणा व्यापारी  सर्व माल किराणा ओळ येथून आणतात. मात्र याच किराणा ओळीच्या आजूबाजूचा बराच भाग हा रेड झोन  घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात सर्व व्यवहार बंद आहेत. बाजाराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून केवळ एकच मार्ग सुरू आहे. मोमीनपुरा मार्ग बंद आहे. सतरंजीपुरा पुढे आहे. भालदारपुरा मध्यंतरी आहे.

मस्कासाथ बंद असून दही बाजार मार्गही बंद असल्याने केवळ शहीद चौकातून किराणा बाजारात प्रवेश दिला जात आहे. मात्र किराणा ओळ ते शहीद चौक येथे  माल वाहतुकीला परवानगी नसल्याने चिल्लर किराणा व्यापाऱ्यांनी माल आणावा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून वाहन आत घेऊन जाणे कठीण आहे.

शिवाय याच भागात तेलाच्या घाणी आहेत. अशात  व्यापाऱ्यांना पायी जावे लागत आहे. त्यामुळे सर्व शहरातील किराणा व्यापारी अडचणीत सापडले आहेत.  व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका आयुक्तांचे आदेश,पोलीस आयुक्तांचे आदेश भिन्न असल्याने अडचण जाणवत आहे. त्यामुळे  व्यवसाय करणेच अवघड झाले आहे.

किराणा ओळमधून आम्ही ठोक भावाने माल घेतो. मात्र आता त्या परिसरात कडेकोट बंद असल्याने  जीवनावश्यक मालाची खरेदीही थांबली आहे. त्यासाठी ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे छोटा किराणा व्यापारी  आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच दुकानांमध्ये मालाचीही कमतरता भासू लागली आहे.

– ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, चिल्लर किराणा व्यापारी संघ.