किराणा, कापड दुकाने सुरू

किरकोळ व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध  कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला शुक्रवारी नागपुरात समिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान ऑनलाईन विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनीही आज बंद पाळला.

बंद दरम्यान गांधीबाग, इतवारी, औषध बाजार कडकडीत बंद होते. मात्र, किराणा ओळ आणि कपडा बाजार नेहमीप्रमाणे सुरू होते. बंदला नाग विदर्भ चेंम्बर्स ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिला होता. सकाळी विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शहीद चौक इतवारी येथील चंडिका माता मंदिर येथे आरती केली. नंतर सर्व प्रमुख बाजारपेठेत पदयात्रा काढून शासनाच्या निर्णयाचा विरोध केला. गांधीबाग, इतवारी, सराफा बाजार, महाल, रेशीम ओळ होलसेल मार्केट, नेहरू पुतळा, धरमपेठ, दवा बाजार या प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद होते.बहूतांश पेट्रोल पंप दुपारी चापर्यंत बंद होते.

गांधीबाग येथील औषध बाजार गुरुवारी मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी पूर्ण दिवस बंद होता. मेडिकल चौकातील बहुतांश औषध दुकानेही शुक्रवारी उघडली नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास झाला.औषध विक्रेत्यांनी संविधान चौकात सरकारच्या विरोधात धरणे दिले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपवण्यात आले. नागपूर जिल्ह्यत जवळपास पाच हजार पाचशे औषध दुकाने बंद होती. त्यामुळे शहरात दिवसाला होणारी अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.