महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना तिसऱ्यांदा भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी प्रभागामध्ये निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. या यादीवर वाडय़ाचे की बंगल्याचे वर्चस्व राहणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. इच्छुकांच्या यादीवर वाडय़ाचे वर्चस्व असले तरी प्रत्यक्षात मात्र अंतिम यादी घोषित होईल त्यावेळी कोणाचे वर्चस्व राहील, याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासोबतच भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या उपराजधानीत आता भाजपची सत्ता आणणे हे स्थानिक नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून वॉर्ड पातळीवर पक्षाने काम सुरू केले आहे. इच्छुक उमेदवाराच्या अर्जाची संख्या बघता दररोज किमान चार ते पाच प्रभागाच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. उत्तर, पश्चिम आणि मध्य नागपुरातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यात दोन्हीकडील इच्छुक आहेत. त्यामुळे वाडा आणि बंगल्यांच्या अवतीभोवती असलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसांपासून यावेळी कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहे. यावेळी नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक वार्ड आरक्षित झाल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी मिळणे शक्य नसले तरी त्यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांचे चेहरे महापालिकेत असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना कशी उमेदवारी द्यावी याबाबत पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न सुरू आहेत.
तीन वेळा महापालिकेत सदस्य राहिलेल्या किंवा माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देऊ नका, पक्षातील सक्रिय असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा उमेदवारीसाठी विचार व्हावा, अशी मागणी गेल्या काही महिन्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आणि वरिष्ठ नेत्यांनी आश्वासने दिली आहेत. भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या असताना त्यांच्याकडे ३८ प्रभागामधून आलेल्या इच्छुक अर्जामध्ये विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले. त्यातील अनेक वाडा व बंगल्याशी संबंधित आहे आणि त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. याशिवाय अनेकजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या तीन महिन्यात दोन बैठकी वाडय़ावर झाल्या आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर नितीन गडकरी यांची नागपूर शहरात असलेली पकड लक्षात घेता त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असला तरी सध्या शहरात वाडा आणि बंगला ही दोन कार्यकर्त्यांसाठी केंद्रस्थाने झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसात काही वाडय़ाशी तर काही बंगल्याशी जवळीक साधून आहेत. शिवाय वाडय़ावर गेल्या काही दिवसात कार्यकर्त्यांची आणि इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. इच्छुकांच्या मुलाखती सुरू होऊन निवड समिती सक्षम उमेदवारांचा शोध घेत असले तरी अंतिम यादीवर कोणाचे वर्चस्व राहील, याबाबत मात्र कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 4:23 am