• उत्तर नागपुरातील सिमेंट रस्ते; खोदकाम व खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त
  • ताप सिमेंट रस्त्यांचा

उत्तर नागपुरात सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाची गती अतिशय संथ असून गेल्या ८ महिन्यांमध्ये ८०० मीटरचेही काम पूर्ण झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

उत्तर नागपुरात जरीपटका फ्लायओव्हर ते ऑटोमोटिव्ह चौक, वैशालीनगर एनआयटी कार्यालय ते गमदूर हॉटेल कामठी रोड, १० क्रमांक पूल ते कमाल चौक, सीएमपीडीआय रोड- दयानंद पार्क ते भीम चौक- पाटणकर चौक आणि इटारसी पूल ते नारा रोड टी-पॉईंट या प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरू आहे. जरीपटका फ्लायओव्हर ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान सुरू असलेल्या कामाबाबत सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी गोविंद कोटवानी म्हणाले की, गेल्या ८ ते १० महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, आजवर केवळ १०० ते २०० मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून तेही काम अपूर्ण आहे. बांधकाम करताना कंत्राटदारांनी व्यवस्थित सुरक्षा कठडे लावणे गरजेचे आहे. नागरिकांना कंत्राटदारांना काही सांगायचे असल्यास कार्यालय नाही किंवा कामासंदर्भात तसेच कंत्राटदाराच्याबाबत माहिती दर्शविणारे फलक नाही. काही दिवसांपूर्वी वादळामुळे कठडय़ाजवळ लावलेले टीन उडाले होते. यामुळे एकाच्या पायाला इजा झाली. परिसरातील नगरसेवक आणि आमदार कधीच नागरिकांच्या समस्येकडे बघत नाही.

जरीपटका परिसरातील रहिवासी प्रकाश वनजानी यांनी सांगितले की, सहा महिन्यांपासून सीएमपीडीआय रोड- दयानंद पार्क दरम्यान जवळपास २०० मीटरचा रस्ता खोदण्यात आला आहे. अद्याप बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळित झाली असून खोदलेल्या खड्डय़ांमध्ये लोक आता कचरा टाकू लागले आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून तेथे आता जनावरे दिवसभर फिरत असल्याने नागरी आरोग्यही धोक्यात आले आहे.

१० क्रमांकाचा पूल ते आवळे चौकादरम्यान गेल्या वर्षभरापासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. आता कुठे सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले. मात्र, अद्यापही रस्त्याच्या कडेला आणि फूटपाथजवळ रस्ते दुभाजक दगड बसविण्यात आले नाही. रस्ता दुभाजक तयार करण्यात आलेला नसून दोन रस्त्यांमध्ये मोठी दरी असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. रात्री सुमारास दररोज एक अपघात या ठिकाणी होतो. शिवाजी रस्त्यावरील घरमालक आणि दुकानदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो, अशी भावना पानठेला चालक सूरज मेश्राम आणि रहिवासी चंद्रकांत कडू यांनी व्यक्त केली. एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी शरद उरकुडे आणि अनिल जाधव यांनीही नारी परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामांवर नाराजी व्यक्त केली. रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदारांनी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. कंत्राटदाराची माहिती व संपर्क क्रमांक असायला पाहिजे. बांधकामाच्या परिसरात तात्पुरते कार्यालय असायला हवे. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा कुणीच प्रयत्न करीत नाही, असेही ते म्हणाले.

  • रस्ते : वैशालीनगर एनआयटी कार्यालय ते गमदूर हॉटेल कामठी रोड, १० क्रमांक पूल ते कमाल चौक रस्ता
  • कंत्राटदार : जेपीई-एसआरके इन्फ्रा (जे.व्ही.)

माती तपासणीला विलंब

रस्त्याची रुंदी लक्षात घेऊन काम करण्यात येते. मातीच्या तपासणीसाठी बराच वेळ निघून जातो. त्यामुळे रस्त्याचे बांधकाम काही प्रमाणात रखडते. परंतु, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि नागरिकांच्या विरोधामुळे अनेक वेळा कामे लांबतात. प्रशासनाकडून मुदतीत अर्थसहाय्य मिळते. नागरिकांना काही प्रमाणात मनस्ताप होत असेल, परंतु त्यांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेण्यात येते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. आपल्याकडे एकूण १३ कोटींची कामे असून त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक सरोज पांडे यांनी दिली.

  • रस्ता : सीएमपीडीआय रोड- दयानंद पार्क ते भीम चौक-पाटणकर चौक
  • कंत्राटदार : आर. एम. दयारामानी प्रा. लि.

काम लवकरच पूर्ण करू

आपल्याकडे १५ कोटींमध्ये तीन रस्त्यांच्या बांधकामाचे कंत्राट आहे. त्यापैकी दोन रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केवळ सीएमपीडीआय रोड ते पाटणकर चौक या रस्त्याचे बांधकाम अपूर्ण आहे. या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले. माती परीक्षणामुळे काही दिवस काम बंद होते. मात्र, लवकरच ते काम पूर्ण करण्यात येईल. निधीची कोणतीही समस्या नाही, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक मुदस्सर नवाब यांनी दिली.

  • रस्ता : इटारसी पूल ते नारा रोड टी-पॉईंट
  • कंत्राटदार : लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सव्‍‌र्हिस प्रा. लि.

तांत्रिक कारणांचा फटका

गेल्या काही महिन्यांपासून निधी उपलब्ध झाला नाही. शिवाय अनेक तांत्रिक बाबींमुळे रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. दिवसा काँक्रिट टाकता येत नसून रात्रीच्या संध्याकाळी ३५ अंश सेल्सिअसच्या तापमानात रस्त्याचे काम सुरू आहे. लवकरच काम गती पकडणार असून आपल्याकडे ११ कोटी रुपयात तीन रस्त्यांचे काम असून लवकरच ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक मनोजसिंग यांनी दिली.

  • आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. – जरीपटका फ्लायओव्हर ते ऑटोमोटिव्ह चौक
  • प्रकल्प व्यवस्थापक – गोपाल जयस्वाल यांचा मोबाईल क्रमांक सतत बंद आहे.