डीजेचा ताल, तीळगुळासह मेजवानीचा आस्वाद
‘ओ.. काट..’, ‘काय.. पो.. छे..’चा पतंगोत्सवातील पारंपरिक वाक्यांचा सतत कानावर येणारा आवाज एकीकडे आणि त्याचवेळी ‘ढील दे.. अरे कटली रे..’ अशी मराठमोळी आरोळी दुसरीकडे. एकूणच काय तर एकीकडे आकाशात पतंगांचा माहोल आणि दुसरीकडे घराच्या गच्चीवर, मोकळ्या मैदानावर डीजेच्या साथीने आणि तीळगुळासह खमंग मेजवानीचा आस्वाद घेत पतंग उडविणारे, असेच काहीसे चित्र आज शहरभर रंगले होते.
संक्रांतीचे असे विविधांगी रूप संपूर्ण महाराष्ट्रातच पाहायला मिळते. त्यातही नागपूरही ‘महानगर’ म्हणून ओळखले जाते. सण असो वा उत्सव नागपुरात तो दणक्यातच साजरा होणार हे ठरलेलेच आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची संस्कृती नागपुरात एकवटली जाते. आजही मकरसंक्रांतीच्या पर्वावर शहरातील सर्व गल्लीबोळात पतंगोत्सवाचा माहोल रंगला होता. सकाळी हलक्याने पतंग उडवण्यास सुरुवात झाली, नंतर पतंगोत्सवाचा माहोल अधिक गडद होत गेला. डीजेच्या तालावर आणि खाद्यपदार्थावर ताव मारत आबालवृद्धांपासून सारेच पतंग उडवण्यात दंग झाले होते.
पश्चिम नागपुरात पतंगोत्सवाची धूम फारशी नव्हती, पण मध्य, पूर्व आणि दक्षिण नागपुरात मात्र सकाळपासूनच ही धूम पाहायला मिळाली. शुक्रवारी आणि इतवारी, महाल परिसरात तर अधिकच धूम होती. या परिसरात गल्लीबोळ मोठय़ा प्रमाणात आहे आणि याच गल्लीबोळात बच्चेकंपनीच नव्हे तर साऱ्यांचीच कटलेली पतंग पकडण्यासाठी धावाधाव सुरू होती. आपली पतंग उडवण्यापेक्षा कटलेली पतंग पकडून ती उडवण्याचा आनंद वेगळाच असतो आणि तोच आनंद या बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. कटलेली पतंग पकडली की पकडणाऱ्यांमध्ये जल्लोष आणि ज्याची पतंग कटली तो मात्र काहीसा नाराज असे हे चित्र शहरभर होते. कापलेली पतंग पकडण्यासाठी इकडून तिकडे धावाधाव आणि छोटीमोठी भांडणही काही ठिकाणी दिसून आली. दिवस जसजसा वर चढत गेला तसतसा पतंगांचा माहोल आणखीच चढलेला दिसून आला.

‘ओ काट’च्या वादातून युवकाचा खून
नवीन बिडीपेठ परिसरात मकरसंक्रांत सणाला गालबोट लागले. ‘ओ काट’ झालेली पतंग लाटण्यावरून उद्भवलेल्या वादातून ताजबागमधील युवकांनी बिडीपेठ येथील एकाला चाकू भोसकून ठार मारले, तर दुसरा एकजण गंभीर जखमी आहे. चंद्रशेखर दामोदरराव वडतकर (३२, रा. नवीन बिडीपेठ) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा मित्र सागर रामदास गायकवाड (३०, रा. नवीन बिडीपेठ) हा गंभीर जखमी असून त्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रशेखर हा घराच्या छतावर पतंग उडवत होता. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सागर, शंकर गौतम मारबते आणि पठाण नावाच्या मित्राने त्याला बिडीपेठ मैदानावर पतंग उडविण्यासाठी घरातून नेले. मैदानावर पतंग उडविताना ते दारू प्यायले. दरम्यान, त्यांनी एक पतंग कापली आणि जमिनीवर पडत असताना सागर पतंग पकडण्यासाठी धावला. तीच पतंग पकडण्यासाठी दुसरीकडून दोन युवक धावले. त्यांची टक्कर झाली आणि वाद उद्भवला. अज्ञात युवकांनी सागरला मारहाण केली. त्यामुळे चंद्रशेखरने मध्यस्थी केली आणि भांडण सोडविताना एका युवकाच्या कानशिलात लगावली.
त्यानंतर अज्ञात दोन युवक मैदानावरून निघून गेले आणि १२.३० च्या सुमारास तीन दुचाकींवरून आठ ते नऊजणांसह तेथे पोहोचले. अज्ञात युवक इतर मुलांसह दिसताच सागर आणि चंद्रशेखर पळू लागले. अज्ञात युवकांनी सागरवर चाकूने वार केले. त्यानंतर चंद्रशेखर पळत असताना शंभर फूट त्याचा पाठलाग केला.
पळत असताना चंद्रशेखर एका खांबाला आदळला आणि जमिनीवर पडला. त्यावेळी अज्ञात युवकांनी त्याच्यावर चाकूने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी दुचाकींवर बसून पळून गेले.
आरोपी युवक हे मोठा ताजबाग परिसरातील असल्याचे सांगण्यात येते. माहिती मिळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपींचा शोध सुरू आहे. परंतु जखमी सागरविरुद्ध पोलिसात अनेक गुन्हे दाखल असून तो कुख्यात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. एल. मुलानी यांनी दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात या घटनेनंतर काहीकाळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे या भागात काहीकाळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.