एसएनडीएलचा ३१ मार्चपर्यंत नवीन प्रयोग; महावितरण बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यातच समाधानी

एसएनडीएल कंपनीने ३१ मार्चपर्यंत तीन शासकीय सुटय़ा आल्याचे बघत ग्राहकांसीठी दूरध्वनी करा, घरातच वीज देयक भरण्याची नवीन सोय उपलब्ध केली आहे, तर महावितरण सुट्टीच्या दिवशी केवळ देयक केंद्र सुरू ठेवण्यातच समाधानी आहे. त्यामुळे महावितरण हे उपक्रम केव्हा राबवणार? असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.

नागपूरच्या गांधीबाग, महाल, सिव्हिल लाईन्स या तीन विभागातील साडेपाच लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्याची जबाबदारी एसएनडीएलकडे आहे, तर इतर भागात महावितरणकडून वीजपुरवठा होतो. महावितरणच्या सर्व नियमांचे पालन एसएनडीएलला करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार महावितरणने २९ मार्चला महावीर जयंती, ३० मार्चला गुड फ्रायडेची सुट्टी आल्याचे बघत ग्राहकांसाठी वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निश्चित केले आहे. एसएनडीएललाही तशा सूचना करण्यात आल्या आहेत, परंतु एसएनडीएलने हे केंद्र सुरू ठेवण्यासह ग्राहकांसाठी देयक भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवली आहे.

सोबत ग्राहकांनी एसएनडीएलच्या टोल फ्री क्रमांकावर देयक भरण्याची इच्छा दर्शवताच ग्राहकांच्या घरात  कर्मचारी जाऊन हे देयक स्वीकारणार आहे. त्याकरिता प्रथम कर्मचारी ग्राहकाकडे जाऊन एसएनडीएलमध्ये काम करत असल्याचे ओळखपत्र दाखवेल. वीज देयकाची रक्कम घेतल्यावर ग्राहकाला रसिद दिल्या जाईल. २०१७- १८ हे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असल्याने बरेच नागरिक त्यात व्यस्त राहतात. त्यामुळे एसएनडीएलच्या ग्राहकांना त्याचा लाभ होईल.