देवेंद्र फडणवीस यांची सूचना

नागपूर : शहरातील करोना संदर्भातील महापालिकेचे कार्य चांगले असून यात आणखी सुधारणेची गरज आहे. शहरात ‘जम्बो हॉस्पिटल’ ऐवजी छोटय़ा रुग्णालयांवर भर द्यायला हवा, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी सोमवारी शहरातील करोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. महापालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात झालेल्या या बैठकीत त्यांच्यासमवेत महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा कोठे उपस्थित होत्या.

‘जम्बो हॉस्पिटल’ उभारण्याऐवजी २०० ते ३०० खाटांची छोटी रुग्णालये उभारा. एकाचवेळी एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे ‘जम्बो हॉस्पिटल’ मध्ये व्यवस्थापन करण्यात अनेक अडचणी येतात.

रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी, रुग्ण तसेच वैद्यकीय चमूंचे कार्य सुरळीत चालावे यासाठी छोटी रुग्णालये जास्त चांगली ठरतील, असे ते म्हणाले. शहरातील ४२ खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतरही रुग्णालयांमध्ये सेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहे. शहरात दररोज ६५०० ते ७ हजार कोविड चाचण्या केल्या जात आहेत. सदर येथील रुग्णालयात कोविड उपचार केले जातील. याशिवाय  इंदिरा गांधी रुग्णालयातही उपचार सुरू करण्यात आले आहे. पाचपावली रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार व त्यांची प्रसूती सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

रुग्णालय चालवण्यासाठी साई मंदिर ट्रस्टचा पुढाकार

सेवाभावी कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे वर्धा मार्गावरील साई मंदिर ट्रस्टने महापालिकेचे इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल  करोना रुग्णांकरिता चालवण्याची जबाबदारी घेतली आहे. रुग्णालयामध्ये करोना रुग्णांना बुधवार, २३ सप्टेंबरपासून दाखल केले जाईल. या रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२ खाटांची व्यवस्था असून  साई मंदिर ट्रस्टतर्फे ५ खाटांवर व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शासकीय रुग्णालयात खाटा कमी उपलब्ध आहे. अशा कठीण प्रसंगी साई मंदिर ट्रस्टने नागरिकांना मोठा आधार दिला आहे.