नागपूर : भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या आंतरराष्ट्रीय बॅडिमटनपटू मालविका बन्सोडने ७ व्या आशियाई बॅडिमटन मुलींच्या एकेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत थायलंडच्या प्रतिस्पर्धीला नमवून विजेतेपद पटकावले, तर मुलांच्या एकेरीत भारताचा एम. वरुणला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलांच्या एकेरीत भारताचा एम. तरुण उपविजेता ठरला. मलेशियाच्या खेळाडूंनी मुला-मुलींच्या दुहेरीत, मुलांच्या एकेरीत व मिश्र दुहेरीत बाजी मारली.

महाराष्ट्र शासन व भारतीय खेळ महासंघाच्या (एसजीएफआय) यजमानपदाखाली मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात १८ वर्षांखालील वयोगटाची आशियाई शालेय बॅडिमटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळच्या सत्रात मुलींच्या एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मालविका बन्सोडने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत थायलंडच्या सोम सवांगसरीला २-० असे सरळ पराभूत करीत विजेतेपद पटकावले. मालविकाने पहिला गेम २१-१३ असा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले. दुसरा गेमही मालविकाने २१-१२ असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.  उपांत्य सामन्यात मालविकाने थायलंडच्या अतिताया पोवनानला २१-१७, २०-२२, २१-१२ आणि सोम सवांगसरीने भारताच्या दीपशिखा सिंगला १३-२१, २१-१७, २१-१३ असे नमवले होते. दोन्ही उपांत्य सामने चुरशीचे झाले. मुलांच्या एकेरीतील अंतिम लढतीत पहिला गेम जिंकणाऱ्या भारताच्या एम. तरुणला अग्रमानांकित मलेशियाच्या कोक जिंग हांगने २-१ असे नमवले.

तरुणने आक्रमक खेळाच्या बळावर पहिला गेम २१-१२ असा जिंकून काहीसे वर्चस्व प्रस्थापित केले. कोक जिंग हांगने उत्कृष्ट व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत दोन्ही गेम २१-१७, २१-१६ असे जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. एम. तरुणला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उपांत्य लढतीत एम. तरुणने मलेशियाच्या  मोहम्मद शकीम इमानला २१-१८, २१-१६ आणि कोक जिंग हांगने थायलंडच्या तेरापत क्लेवानला २१-१३, २१-१६ असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती.

स्पर्धेत मुलींच्या दुहेरीच्या अंतिम लढतीत पहिला गेम गमावणाऱ्या द्वितीय मानांकित मलेशियाच्या लोव यीन युआन व वैलेरी स्लोव या जोडीने चिनच्या चुई हाओरन व ताओ यिंग या जोडीला ५५ मिनिटे झालेल्या सामन्यात २०-२२, २१-१६, २१-१३ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले. मुलांच्या दुहेरीत मलेशियाच्या ओई झी दर व व्यामन गोह वाई याप या जोडीने मलेशियाच्या  ली शून यांग-ली यी बो या जोडीला ४३ मिनिटाच्या लढतीत २१-१६, १५-२१, २१-१९ आणि मिश्र दुहेरीमध्ये अग्रमाानांकित मलेशियाच्या याप रोई किंग व गण जिंग इर या जोडीने उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ३४ मिनिटे झालेल्या लढतीत मलेशियाच्या वान मोहम्मद आरिफ व टी.लेक्सुआन या जोडीला २१-१६, २३-२१ असे नमवून विजेतेपद पटकावले.

क्रीडामंत्र्यांची दांडी 

क्रीडामंत्री विनोद तावडेने नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होत असलेल्या ७ व्या अशियाई स्कूल बॅडिमटन चॅम्पियनशिप स्पर्धेत येण्याचे कष्ट घेतले नाही. नागपूर शहरात पावसाळी अधिवेशन सुरू असून क्रीडामंत्री तावडे नागपूरातच होते. तसेच दोन्ही सभागृह दुपारी तहकूब झाल्याने तावडे यांनी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला हजर राहणे अपेक्षित होते. यापूर्वी देखील सप्टेंबर महिन्या वरिष्ठ गटाच्या बॅडिमनट स्पर्धा नागपुरात झाल्या होत्या. या स्पर्धेत भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू पी.व्ही. सिंधू,सायना नेहवाल,कादंबी श्रीकांत,पी. गोपिचंद सारखे खेळाडू आले होते. त्यावेळी देखील उद्घाटनाला किंवा बक्षीस वितरण सोहळ्याला क्रीडामंत्र्यांनी येण्याचे कष्ट घेतले नाही. मुख्यमंत्र्यांच्या शहरात मंत्री महोदय न आल्याने क्रीडा वर्तुळात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.