03 March 2021

News Flash

लग्न संकेतस्थळावरून श्रीमंत महिला शोधणारा जेरबंद

पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून लुटायचा

पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून लुटायचा

नागपूर : ‘लेडिज विरुद्ध रिक्की बहल’ या चित्रपटाप्रमाणे श्रीमंत मुलींना हेरून त्यांना प्रेम व लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्याला त्याच्या साथीदारासह जेरबंद करण्यात आले. ही कारवाई सोनेगाव व प्रतापनगर पोलिसांनी संयुक्तपणे केली. आरोपींकडून पोलिसांनी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मिक्की सिंग जगजीतसिंग साहनी (३८), आणि आनंद उमेश शाहू (३०), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मिक्की याने शादी डॉट कॉम, जीवनसाथी आणि संगम विवाह संकेतस्थळावर रोमी अरोरा व रिंपी खंडूजा या नावाने स्वत:चे बनावट खाते तयार केले होते. त्यात स्वत:ला एका कंपनीचा मालक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे विवाहेच्छुक तरुणी त्याच्या संपर्कात येत होत्या. त्यानंतर तो त्यांना भेटायला वेगवेगळ्या शहरात बोलवायचा. तेथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबून मुलींना आकर्षित करायचा. रात्री त्या झोपेत असताना त्यांच्या अंगावरील दागिने, मौल्यवान वस्तू व रोख रक्कम लंपास करायचा. दुसऱ्या दिवशी तरुणींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे. अशाप्रकारे त्याने ८ नोव्हेंबरला एका तरुणीला उपराजधानीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लुटले. दिल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरीला असलेली तरुणी त्याला भेटण्यासाठी विमानाने नागपुरात आली. दुसऱ्या दिवशी आरोपी तिचे जवळपास दोन लाखांचे दागिने व रोख घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सोनेगाव व प्रतापनगर पोलिसांनी संयुक्तपणे प्रकरणाचा तपास करून आरोपीने हॉटेलमध्ये येण्यासाठी वापरलेल्या ओला कारचा शोध घेतला. ही कार बुक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावरून तो मध्यप्रदेशातील बैतुलचा असल्याचे स्पष्ट झाले.  पोलीस बैतुलला गेले व आरोपीला ५ डिसेंबरला अटक केली. आनंद शाहू याने त्याला बनावट नावासाठी दोन ओळखपत्र तयार करून दिले होते. त्याच्याकडून वेगवेगळया कंपनीचे अनेक मोबाईल, दुचाकी, मौल्यवान वस्तू व १ लाख ८३ हजार रुपये रोख असा एकूण ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती हसन यांनी यावेळी दिली. आरोपींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता १० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सुमारे १०० तरुणी संपर्कात

आरोपीविरुद्ध यापूर्वीचे जबलपूर व भोपाळ येथे अशाचप्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याचे विविध संकेतस्थळ व मोबाईल क्रमांकावरील संवाद तपासले असता देशभरातील १०० विवाहेच्छुक तरुणी त्याच्या संपर्कात होत्या. त्यापैकी ८ तरुणी नागपुरातील असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 2:22 am

Web Title: man arrested for searchng rich woman on wedding website zws 70
Next Stories
1 सलग दुसऱ्या दिवशी करोनामुक्तांहून नवीन बाधित अधिक
2 शेतकऱ्यांच्या आजच्या ‘भारत बंद’ला विविध संघटनांचा पाठिंबा
3 रिफायनरी- पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विदर्भात आमंत्रण!
Just Now!
X