18 January 2019

News Flash

कुरिअरमधून कोकेनची तस्करी करणाऱ्यास अटक

पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील मधु कुरिअर कंपनीच्या संचालकाला सापळा रचून अटक केली.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : कुरिअरमधून अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसील पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील मधु कुरिअर कंपनीच्या संचालकाला सापळा रचून अटक केली. पुष्पेश रामरतन सैनी (३४) रा. गुरुदेवनगर असे आरोपी संचालकाचे नाव आहे. पुष्पेश हा कोकेन घेऊ न जात असल्याची माहिती तहसील पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक पोलीस आयुक्त राजरत्न बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सहायक निरीक्षक अतुल मोहनकर, हवालदार श्याम मिश्रा, लक्ष्मण शेंडे, शैलेश दोबोले, सचिन टापरे, किशोर गरवारे, संजय बरेले, रोशन फुकट, मनीष रामटेक व निशा उमरेडकर यांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील त्रिमूर्तीसदन परिसरात सापळा रचला. पुष्पेश हा एमएच-४९, क्यू-०५७७ क्रमांकाच्या मोपडने जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून त्याला पकडले.

कुरिअरमधून हवाला

काही दिवसांपूर्वी नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत हवालाची कोटयवधी रक्कम पकडण्यात आली. त्यानंतर ‘लोकसत्ता’ने कुरिअरमधून हवालाचा व्यवसाय करण्यात येत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर कुरिअरमधून कोकेनच्या तस्करीची घटना उघड झाल्याने हवालाच्या अनुषंगाने तपास करण्यात येण्याची गरज आहे.

First Published on May 17, 2018 4:22 am

Web Title: man arrested for smuggling cocaine in the courier