नागरिकांनी पार्थिव महापालिकेत आणले

नागपूर : वाठोडा परिसरात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्थेच्या प्रस्तावित जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हे दाखल  करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त वाचून वाठोडा परिसरातील ५० वर्षीय गिरीश वर्मा यांचा  मृत्यू झाला, असा दावा करीत परिसरातील नागरिकांनी वर्मा यांचा मृतदेह महापालिकेत आणला. न्याय मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेतले. यावेळी महापौर व महापालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची जोरदार घोषणाबाजी केली.

महापालिकेने भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) ला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षांसाठी लीजवर दिली आहे. मात्र या प्रस्तावित जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली. यासंबंधी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे तसेच अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांना २४ तासाचे नोटीस देऊन त्यांच्या विरुद्ध महापालिका व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एन.एम.आर.डी.ए.) ची संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले. ही बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली. मृत गिरीश वर्मा यांचे या जागेवर  बांधकाम सुरू असून ते  काम पाहण्यासाठी गेले असता त्यांनी ती बातमी वाचली आणि ते भोवळ येऊन पडले. त्यात त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे आणि त्यांच्या नातेवाईकांनी केला. सकाळी ९ वाजता त्यांचे निधन झाल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिक व नातेवाईक महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गिरीश वर्मा यांचे पार्थिव  घेऊन आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्तांचा निषेध करत व त्यांच्या विरोधात घोषणा देत  न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, पोलिसांनी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत अंत्यसंस्कारानंतर  चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र आंदोलक  तयार नव्हते. अखेर पोलिसांनी सर्व आंदोलकांना  ठाण्यात नेले आणि पार्थिव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात  शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

वाठोडा येथील प्रस्तावीत जागेवर लेआऊट निर्माण करत तेथील भूखंड नागरिकांना विकण्यात आल्यानंतर अनेकांनी घरे बांधली. २०१४ मध्ये ही जागा साईसाठी प्रस्तावित करण्यात आली होती.  गेल्यावर्षी या संदर्भात विधानसभेचे माजी सभापती नाना पटोले यांनी मुंबईत बैठक घेत  तोडगा काढला आणि प्रशासनाला त्यासंदर्भात आदेश दिले. मात्र सोमवारी महापौर  तिवारी यांनी या भागात अतिक्रमण करण्यात आलेल्या लोकांवर २४ तासात कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गिरीश वर्मा यांचा मृत्यू हा वर्तमानपत्रात आलेल्या बातमीमुळे झाला असून याला महापालिका दोषी आहे. त्यामुळे महापालिकेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अवंतिका लेकुरवाळे यांनी केली.