देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

एखाद्या संघर्षांतून मार्ग काढायचा असेल तर साधकबाधक विचार करणे गरजेचे ठरते. पांढरकवडय़ाच्या वाघिणीच्या संदर्भात विदर्भातील तथाकथित वन्यजीवप्रेमींनी गेल्या दोन महिन्यापासून जो गहजब माजवला आहे तो एकतर्फी तर आहेच शिवाय वास्तवापासून दूर जाणारा आहे. मुळात या प्रेमींना वास्तवाचे भान कमी आहे. अशावेळी सरकार आणि न्याय यंत्रणेने वस्तुनिष्ठ भूमिका घेणे गरजेचे असते. या दोन्ही यंत्रणांनी यावेळी ती घेतली, हे बरे झाले. मानव आणि वन्यप्राण्यांमध्ये होणारा संघर्ष हा येत्या काळातील कळीचा मुद्दा राहणार आहे. त्याची कारणे उघड व स्पष्ट आहेत. १९७२ नंतर देशात वन्यजीवांच्या शिकारीवर बंदी आली. त्यानंतरच्या दोन दशकात वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न फार गहन झाला नाही; कारण त्यांची संख्या कमी होती. नव्वदच्या दशकात वाघ व इतर प्राणी झपाटय़ाने कमी झाले. त्यावरून ओरडा झाला व त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रेमींची संख्या वाढली ती याच काळात! सरकार, हे प्रेमी व इतर साऱ्यांच्या प्रचारामुळे वाघ तर भरपूर वाढले. मात्र त्यांना सामावून घेणारे जंगल तेवढेच राहिले. उलटपक्षी कमी झाले. याच काळात विकास प्रकल्पाच्या नावावर सुद्धा जंगलाचा ऱ्हास झाला. कमी झालेले हे जंगल वाढवायची जबाबदारी केवळ सरकारची होती, आमची नाही असा जाहीर युक्तिवाद आता हे प्रेमी करू शकतात काय? केवळ प्राणी वाचायला हवे, त्यांना राहण्यासाठी लागणारे जंगल तयार करण्याची जबाबदारी आमची नाही अशी भूमिका हे प्रेमीच नाही तर कुणीच घेऊ शकणार नाही. शेवटी पर्यावरण संतुलन राखणे ही समाजाची सुद्धा जबाबदारी आहेच. या टप्प्यावर हे प्रेमी कधी भांडताना वा न्यायालयात जाताना दिसत नाही. याच पांढरकवडय़ाच्या बाजूला एका सिमेंट कंपनीने जंगल लाटले. गोंदियात कशी लूट सुरू आहे हे सर्वाना ठाऊक आहे. यावर हे प्रेमी लढा का देत नाहीत? प्रतिस्पर्धी तगडा असेल तर चूप बसायचे आणि वाघाच्या भीतीने घरी बसणारा गरीब गावकरी असेल तर गहजब करायचा, हा दुटप्पीपणा झाला. वन्यप्राणी वाचलेच पाहिजेत पण माणसाचे बळी जाऊन नाही, ही भूमिका यांना मान्यच होताना दिसत नाही. त्या वाघिणीसाठी न्यायालयात जाणारे, स्वत:ला रंगवून घेणारे, माध्यमातून एकतर्फी प्रचार घडवून आणणारे किती जण पांढरकवडय़ाच्या या दहशतग्रस्त भागात फिरून आले? किती जणांनी तेथील गावकऱ्यांशी बातचित केली? नागपुरात बसून ‘अवनी लव्ह यू’ म्हणणे सोपे आहे. गावात एक रात्र राहणे कठीण आहे. याची जाण या प्रेमींना नाही. एक विदुषी तर खास न्यायालयात जाण्यासाठी मुंबईहून येथे आल्या पण त्या भागात फिरकल्या नाहीत. दोन्ही बाजू जाणून घ्यायच्या नाहीत व आभासी जगाला साद घालणाऱ्या भूमिका घ्यायच्या, हे ढोंग आहे. वाघाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्यांना स्वत:चा ढोंगीपणाही लक्षात येत नाही. आता तर अमरावती भागातही हा संघर्ष सुरू झाला आहे. वाघाच्या भीतीने लोकांनी शेतात जाणे सोडून दिले आहे. शाळा बंद केल्या जात आहेत. तरीही हे प्रेमी एकच हट्ट धरत असतील तर ते दहशतग्रस्तांवर अन्याय करणारे आहे. न्यायालयीन लढाई लढणाऱ्या एकाने पांढरकवडा भागात गुरांसाठी १८ टन चारा पाठवला. या वाघिणीची दहशत असलेल्या भागात २८ ते ३० हजार पशूधन आहे. त्यांचा एका दिवसाचा सुद्धा हा आहार नाही. हा सारा प्रकार आपल्याला कुणी एकतर्फी म्हणू नये म्हणून घेतलेले सोंग आहे. काही दिवसांपूर्वी याच सदरात विदर्भात चराईची क्षेत्रे सरकारने निर्माण केली नाही असे म्हटले होते. त्याकडेही हे प्रेमी कधी गांभीर्याने बघणार नाही. वाघासाठी धावपळ केली तर पुरस्कार मिळतो, जनावरांच्या पोटासाठी धावपळ केली तर पदरात काही पडत नाही, हे यांना चांगले ठाऊक आहे. मुळात वन्यप्राण्यांची संख्या वेगाने वाढत असेल व त्यामुळे काही प्रश्न निर्माण होत असतील तर त्यांना ठार मारणे ही संपूर्ण जगभरात मान्यता पावलेली पद्धत आहे. इंग्रजीत त्याला कलिंग (Culling) म्हणतात. या प्रेमींकडून याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जाते. ‘ती वाघीण नरभक्षक नाही, आधी वाघीण पकडा, नाही, आधी बछडे पकडा’ यासारखे युक्तिवाद म्हणजे दांभिकपणाचा कळस आहे. मुळात जंगलात वाघीण वा तिचे बछडे समोर आल्यावर कशी परिस्थिती उद्भवते यावर साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. तेव्हा शिकारी जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागतो. वातानुकूलित हवेत गप्पा मारत असे काहीही ठरवता येत नाही. इतकी साधी समज नसलेल्या या गहजबकारांना प्रेमी तरी कसे म्हणायचे? या वाघिणीला जिवंत वा मृत ताब्यात घेण्यासाठी नेमलेल्या नबाबवर तर यांनी टीकेची राळ उडवली. ती पूर्णत: अनाठायी आहे. नेमबाजीचे कौशल्य आत्मसात केलेला नबाब हा देशातील एकमेव आहे. त्यामुळे त्याला बोलावण्याशिवाय वनखात्याकडे दुसरा पर्याय नाही. नबाबवर एवढाच आक्षेप असेल तर वन्यजीव विभागाने गेल्या तीन दशकात असे पेचप्रसंग सोडवू शकणारा एकही नेमबाज का तयार केला नाही? या विभागाला असे करण्यापासून कुणी रोखले होते? वाघ व वन्यजीवांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात हा संघर्ष मोठा होऊ शकतो. तेव्हा अशा नेमबाजांची, बेशुद्धीकरणात तरबेज असलेल्यांची गरज पडेल हे या विभागाला का सुचले नाही? पंचतारांकित हॉटेलात वाघावर व्याख्यान झोडणाऱ्या या प्रेमींना अशी मागणी का करावीशी वाटली नाही? वाघांचे वाढते हल्ले ही भविष्यातील संघर्षांची नांदी आहे. त्यामुळे आता तरी या विभागाने बेशुद्धीकरण तज्ज्ञाच्या नावावर निवृत्तांना पोसण्यापेक्षा अशी परिस्थिती हाताळण्यासाठी स्वत:चे मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. असे सल्ले हे प्रेमी कधी देताना दिसत नाही. याच नाही तर समाजात उद्भवणाऱ्या कोणत्याही संघर्षांतून तोडगा काढताना सर्व बाजूचा साकल्याने विचार होणे गरजेचे असते. ते न करता जंगलात जाऊ नका, जनावरे पाळू नका, शेतात जाऊ नका असे फुकटचे सल्ले देणाऱ्यांना प्रेमी तरी कसे म्हणायचे? या प्रश्नावर अनिश अंधेरिया, बिट्टू सहगल व काहींनी घेतलेली भूमिका संयुक्तिक व समतोल आहे. यवतमाळातील तणावग्रस्त शेतकऱ्यांचा विचार करा, एका वाघिणीच्या जीवासाठी सर्व वाघांना खलनायक ठरवू नका, असे म्हणत या मान्यवरांनी विदर्भातील प्रेमी किती तकलादू भूमिका घेऊन जगणारे आहेत, हेच दाखवून दिले आहे.