दुहेरी हत्याकांडाला नवीन वळण

नागपूर : बेला पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाला वेगळेच वळण लागले असून तरुणीवर प्रेम केल्याने आरोपींनी एका तरुणाचे लिंगच कापल्याचा धक्कादायक प्रकार तपासात निष्पन्न झाला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विक्की ऊर्फ मिंटू मोहन धासे, जयसिंग बलबिरसिंह तिलपितीया (४३) आणि दशरथसिंह ऊर्फ अवतारसिंह तिलपितीया (२७) सर्व रा. सिर्सी, अशी आरोपींची नावे आहेत.

संतोषसिंह तिलापितीया (२४) आणि संगतसिंह तिलापितीया (२२) दोन्ही रा. महालगाव, भिवापूर अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या गावापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्य़ाची सीमा आहे. पैशासाठी ते चंद्रपूर येथे दारू तस्करी करायचे. मृत संगतसिंह याचे सिर्सी गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच्या प्रेमसंबंधाला तरुणीच्या आई-वडिलांचा विरोध होता. १६ जुलैला रात्रीच्या सुमारास दोघेही भाऊ दारू तस्करी करण्यासाठी दुचाकी घेऊन घरातून निघाले असता परतले नाहीत. दोघांनाही पोलिसांनी पकडले असावे, असा त्यांच्या कुटुंबीयांचा समज झाला. पण, इतके दिवस उलटल्यानंतर ते न परतल्याने त्यांच्या तिसऱ्या भावाला शंका आली. त्यांनी भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वनकर्मचाऱ्यांना जंगलात त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत लाकडांखाली झाकलेले मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला असता संगतसिंग याचे एका तरुणीवर प्रेम होते व त्याला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी खुनाची कबुली दिली. रात्रीच्या अंधारात लपून दोघेही भाऊ जाणाऱ्या दुचाकीला लाकडाने मारले. ते जमिनीवर पडल्यानंतर दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आले. त्यापैकी संगतसिंगचे लिंगही कापण्यात आले. मृतदेह कुजलेले असल्याने शवविच्छेदन करताना हा प्रकार समोर आला. आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.