सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

नागपूर : समाजात काही लोक नकारात्मक विचार करून समाजाभिमुख कार्य करणाऱ्यातही  दोष शोधत असतात. येणाऱ्या दिवसात ही नकारात्मकता जास्त दिसून येईल. त्यामुळे समाजात कुठलीही अपेक्षा न ठेवता सकारात्मक काम करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान केलाच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्यावतीने पत्रकार अविनाश पाठक, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, जलतरणपटू स्मिता काटवे- मामर्डे, शिवशाहीर संतोष साळुंके, ज्येष्ठ छायाचित्रकार जयंत हरकरे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, अर्जुन कृष्णन अय्यर आणि सार्थक धुर्वे यांना राजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरसंघचालक बोलत होते. आज गुरुवारी महालातील भोसले राजवाडा परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला अंजनगावसुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, राजे मुधोजी भोसले (पंचम) लक्ष्मीकांत देशपांडे, ठाकूर किशोर सिंह , राजे मुधोजी भोसले (तृतीय) उपस्थित होते. सकारात्मक काम करणाऱ्यामध्ये चांगले गुण असणे ही दैवी संपत्ती आहे. स्वार्थ किंवा अहंकार न ठेवता ते काम करत असतात. त्यामुळे अशा व्यक्तीच्या कामाकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे. मात्र, आगामी निवडणुका बघता समाजात त्यांच्या कामाकडे सकारात्म दृष्टीने बघण्यापेक्षा नकारात्मकता ऐकायला मिळेल. चांगले गुण शोधण्यापेक्षा त्यात वाईट काय आहे याचा विचार केला जाईल मात्र, त्यातून काही साध्य होणार नाही. समाजात चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. भारताला समोर नेणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यांच्यामध्ये प्रेरणा जागवली पाहिजे, असेही डॉ. भागवत म्हणाले. यावेळी जितेंद्रनाथ महाराज यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्तावित राजे मुधोजी भोसले यांनी तर संचालन एम.ए. कादर व सारंग ढोक यांनी केले. पुरस्कारप्राप्त अविनाश पाठक आणि संतोष साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले.