वादग्रस्त शिकारी नवाबवरून वनखाते व मनेका गांधी यांच्यात वाद

पांढरकवडय़ातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी वादग्रस्त शिकारी नवाब शाफत अली खानला वन खात्याने पाचारण केले आहे. मात्र, त्याला पाचारण करण्यावरून वनखाते आणि केंद्रीय महिला-बाल कल्याण  मंत्री मनेका गांधी यांच्यातच वाद सुरू झाल्याने वाघिणीची शिकार होण्याऐवजी शिकाऱ्याचीच ‘शिकार’ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नवाबला परत पाठवण्याचा निर्णय झाल्याचे मनेका गांधी सांगत असल्या तरी वनखात्याने मात्र हे वृत्त नाकारले आहे. त्यामुळे नवाब ‘आत की बाहेर?’याबाबतची संदिग्धता कायम आहे.

वनखात्याने पाचारण केलेल्या शिकारी नवाबला राज्यातूनच नव्हे तर शेजारच्या मध्यप्रदेशातूनदेखील विरोध होत आहे. वनखात्याने एकाचवेळी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी मध्यप्रदेशातील पथकाला तर शिकारीसाठी नवाबला बोलावले. मध्यप्रदेशचे पथक वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याच्या प्रयत्नात यशस्वी होत असतानाच नवाबने दोनदा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. नवाबाच्या या प्रयत्नांना पांढरकवडा क्षेत्राच्या महिला उपवनसंरक्षक के.एल. अभर्णा यांनी तीव्र विरोध केला. मात्र, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांनी अभर्णा यांनी नवाबची माफी मागावी यासाठी चार दिवसांपूर्वी रात्री हॉटेलात पाठवले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत घेत मनेका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला याची चौकशी करण्यास सांगितले. त्यांचा अहवाल आल्यानंतर शाफत अली खानला परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात मिश्रा यांन्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला. नवाबला परत पाठवण्याचे आदेश आलेले नाहीत. नवाब हा मोहरमसाठी परत गेला आहे. तो किती दिवसांसाठी गेला हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. एकूणच नवाबच्या वागण्याने त्याच्या विरोधात वातावरण आणखी तापले असून आंदोलनेही सुरू झाली. वन्यजीवप्रेमी अजय दुबे यांनी तर यवतमाळ मुख्य वनसंरक्षकांना याबाबत नोटीसही पाठवली आहे.