आठ दिवसांची पोलीस कोठडी
नागपूर : शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे त्याची कोटय़वधींची संपत्ती भावाच्या नावावर असल्याची माहिती तपासात निष्पन्न होत आहे.
मंगेश कडव याच्याविरुद्ध आतापर्यंत सक्करदरा, हुडकेश्वर, अंबाझरी, बजाजनगर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी मागणे, धमकावण्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. आठवडाभरापासून तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधात पोलीस भंडारा, गडचिरोली व मुंबई येथेही जाऊन आले. सोमवारी त्याची पत्नी डॉ. रुचिता हिला रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडताच तिला अटक करण्यात आली. त्याचवेळी मंगेश कडवही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती होती. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर व त्यांची चमू त्याच्या मागावर होती. मंगेश पांढराबोडी परिसरात लपून बसला होता. बुधवारी रात्री ऑटोमधून मित्राच्या घरी जात असताना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. फरार असताना तो भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, मौदा, आणि पारडी परिसरातील नातेवाईक व मित्रांकडे लपला होता, अशी माहिती समोर येत आहे. त्याला आज गुरुवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या बँकेची दहा खाती तपासली असता त्यात ठोस रक्कम सापडली नाही. अनेकांना लाखोंची टोपी घालणारा मंगेश कडव याच्याकडे पैसा नसणे, यावर कुणाचा विश्वास बसत नाही. शेवटी पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सर्व संपत्ती आपल्या भावाच्या नावावर करून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच पोलिसांकडून ती संपत्ती जप्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 2:22 am