झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत भ्रष्टाचाराचा माणिकराव ठाकरे यांचा आरोप
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत काम करणाऱ्या विकासकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस उपाध्यक्ष असलेल्या बँकेत पैसे जमा करण्याचा आदेश काढल्याने मुख्यमंत्र्यांकडून पदाचा दुरुपयोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला.
मुंबई आणि ठाण्यात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतून घरे बांधण्यात येत आहेत. ही कामे १२०० विकासक करणार आहेत. या विकासकांना अ‍ॅक्सिस बँकेच्या वरळी शाखेत खाते उघण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे प्रमुख आहेत तर अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेच्या या शाखेत उपाध्यक्ष आहेत. एसआरए योजनेत काम करणाऱ्या सर्व विकासकांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या वरळी शाखेत खाते उघडावे. निर्धारित मुदतीत खाते काढण्यात न आल्यास महिनाअखेपर्यंत प्रतिदिवस १ लाख आणि १ मार्च प्रतिदिवस ५ लाख रुपये दंड आकारण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे. यासाठी निविदा काढण्यात का आल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांची पत्नी या बँकेत असल्याने हे मुख्यमंत्री कार्यालयाने हे आदेश काढले आहेत. बँकेला लाभ पोहोचवण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे, असा सवालही ठाकरे यांनी केला.
‘एसआरए’ योजनेच्या नियमानुसार पुनर्विकास होईपर्यंत विकासकांनी झोपडवासीयांना प्रतिमहिना भाडे द्यायचे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक झोपडपट्टीधारकांना ८ ते १२ हजार रुपये भाडे मिळणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेत भाडय़ाची रक्कम जमा करण्यास एसआरएने विकासकांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाच्या लाभासाठी पदाचा दुरुपयोग केला आहे. हा संपूर्ण व्यवहार अडीशे ते तीनशे कोटींचा आहे. राष्ट्रीयीकृत बँकेला न देता पत्नी असलेल्या खासगी बँकेच्या शाखेत खाते उघडण्याचे बंधनकारक करणे हा भ्रष्टाचार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी नागपुरात कोणत्या पदावर कार्यरत होत्या आणि मुंबईत गेल्यावर कोणत्या पदावर कार्यरत आहेत. त्यांना पदोन्नती देण्याच्या मोबदल्यात बँकेच्या फायद्यासाठी सरकारी योजनेचा निधी बँकेत वळता करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

पदाचा दुरुपयोग
स्वच्छ प्रतिमा असल्याचे सांगायचे आणि कुटुंबीयांना लाभ पोहोचवण्यासाठी पदाचा दुरुपयोग करायचा हे भाजपचे धोरण आहे. यापूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी पटेल यांची प्रकरणे पुढे आली. राज्यातील मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि गिरीश बापट यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाटय़ावर आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.