नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार मनोहर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे हैदराबाद येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांनी अगदी तरुण वयात दैनिक युगधर्ममध्ये आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती. वृत्तपत्रीय क्षेत्रात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचे सचिव होते. अनेक वर्षे ते पत्रकारांच्या मागण्यांसाठी लढले. अखिल भारतीय पत्रकार महासंघाचेही ते पदाधिकारी होते. १९७८ ते १९८१ या काळात ते महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरही त्यांनी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून काम केले. बंद पडलेले वृत्तपत्र पत्रकारांनी सहकारी तत्त्वावर चालवण्याचा प्रयोग त्यांनी नागपुरात केला होता. मनोहरराव अंधारे यांच्या निधनाने स्वातंत्र्यानंतरच्या पत्रकारितेतील एक युग अस्तंगत झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशा शब्दात पालकमंत्री नितीन राऊत यांनी भावना व्यक्त केल्या. नागपूर श्रमिक पत्रकार संघ व ट्रस्टच्यावतीने प्रदीप मैत्र, ब्रम्हशंकर त्रिपाठी यांनी बाबासाहेब अंधारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.