15 August 2020

News Flash

औषधवैद्यक, भूलतज्ज्ञ वगळता अनेक डॉक्टर गैरहजर

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयांतील प्रकार; कारवाईचा आदेश

संग्रहित छायाचित्र

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयांतील प्रकार; कारवाईचा आदेश

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील औषधवैद्यक आणि भूलतज्ज्ञ या दोन विषयातील डॉक्टर वगळून इतर अनेक डॉक्टर विनापरवानगी करोना संकटातही सेवेवरून बेपत्ता झाले आहेत. या डॉक्टरांसह गैरहजर कर्मचाऱ्यांनीही हजर होऊन प्रशासनाने दिलेले काम न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठात्यांना दिले आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित असलेल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना शासनाने कोविड रुग्णालये म्हणून घोषित केले आहे. सर्वच रुग्णालयांत कमी-अधिक प्रमाणात बाधितांवर उपचार सुरू आहेत. मुंबई, पुणे, अकोला, अमरावती, नाशिक, नागपूरसह इतरही काही शहरात सातत्याने बाधित वाढत असल्याने येथील वैद्यकीय खात्याची रुग्णालयात कामाचा ताण  खूपच वाढला आहे. करोनाग्रस्तांवर उपचारात औषधवैद्यक आणि भूलतज्ज्ञ विभागातील डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे.  दुसरीकडे या सर्व रुग्णालयांतील इतर विविध विषयातील अनेक डॉक्टर  प्रशासनाला सूचना न देता सेवेवरून बेपत्ता राहतात. काही जण सकाळी हजेरी लावून एक-दोन तासांतच गायब होतात. नागपूरच्या अतिविशेषोपचार रुग्णालयासह इतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयांत हे चित्र आहे. त्यावरून वैद्यकीय शिक्षण खात्याने सर्व महाविद्यालयांतील अधिष्ठात्यांना यापुढे विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या व प्रशासनाने दिलेली काम न करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मेडिकल प्रशासनाने असे आदेश आल्याच्या वृत्ताला दुजोरा देत येथील सगळ्याच विभागातील डॉक्टरांच्या सेवा लावण्यात आल्याचा दावा केला. सोबत रोज दुपारी १२ वाजता डॉक्टरांच्या हजेरीची माहिती घेत त्याचा अहवाल वैद्यकीय संचालकांना सादर होत असल्याचेही सांगण्यात आले.

या विभागांवरही कामाचा भार

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील कान- नाक- घसा रोग विभागातील डॉक्टरांवर करोना संशयीत रुग्णांच्या नाक किंवा घशातील द्रव्याचे नमुने चाचणीसाठी घेणे, सूक्ष्म जिव रसायनशाशास्त्र विभागातील डॉक्टरांकडे विषाणू प्रयोगशाळा असल्यास करोनाच्या चाचण्या करणे, विकृतीशास्त्र विभागातील डॉक्टरांवर रुग्णांच्या रक्तासह इतर काही तपासणी करण्याचा भार आहे. तर अनेक विभागातील निवासी डॉक्टर करोनाशी संबंधित कामे करत असल्याची चित्र आहे. परंतु अनेक वरिष्ठ डॉक्टरांकडे काम नसल्याने त्यांनाही अधिष्ठात्यांकडून कामे दिल्या जाण्याची अपेक्षा या आदेशातून पुढे आली आहे.

कामाबाबतचे नियोजन

शासनाच्या आदेशात प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठात्यांना औषधवैद्यक आणि बधिरीकरणशास्त्र विषयातील डॉक्टरांच्या व्यतिरिक्त विभागांच्या डॉक्टरांकडे करोनाशी संबंधित विविध माहिती शासनाला पाठवणे, आय.सी.एम.आर.सह इतर ऑनलाईन पद्धतीने रुग्णांची माहिती भरणे, जिल्हाधिकाऱ्यांसह इतर यंत्रणांशी संपर्क साधणे, विविध औषधांसह साहित्यांसह इतर खरेदी प्रक्रियेच्या पाठपुरावा करणे, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सहाय्य, त्यांच्या कामाच्या व्याप्ती बघून चक्रानुक्रमाने कार्य वाटून द्यायचे आहे.

वैद्यकीय संचालकांनी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगमध्ये सगळ्या विभागातील डॉक्टरांना करोनाशी संबंधित कामे देण्यास आधीच सांगितले होते. त्यामुळे मुंबई, नागपूरच्या रुग्णालयांत बहुतांश डॉक्टरांना कामे दिली गेली. दरम्यान, गुरुवारी मेयो रुग्णालयात हा आदेश मिळाल्यावर कमी कामाचा भार असलेल्या शस्त्रक्रिया विभागासह इतरही डॉक्टरांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

– डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:53 am

Web Title: many doctors are absent except pharmacologists and anesthesiologists zws 70
Next Stories
1 जैवविविधता मंडळाचे अध्यक्षपद रिक्त असल्याबाबत वनमंत्री अनभिज्ञ
2 करोनाबाधितांची एकूण संख्या चारशे पार!
3 कर्मचाऱ्याचा खून करून पेट्रोल पंप लुटला
Just Now!
X