मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

नागपूर : बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्राचा वेगाने विकास होत असल्याने येथे उद्योग उभारण्यासाठी अनेक विदेशी कंपन्या इच्छुक आहेत. होरिबाचा प्रकल्प रिजन्ट फॅक्टरी, सेंट्रल वेअरहाऊस आणि डिस्ट्रीब्युशन सेंटर असा असून ही भारतातील हिमॅटोलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात होत आहे. या गुंतवणुकीमुळे इतरही विदेशी कंपन्या राज्यात येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात जपानच्या होरिबा कंपनीचे भूमिपूजन रविवारी झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, होरिबा इंडियाचे अध्यक्ष जय हाकू, खासदार विकास महात्मे, आमदार समीर मेघे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, होरिबा नागपूरचे व्यवस्थापक डॉ. राजीव गौतम उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जय हाकू यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात नागपूरलाही लवकरच होरिबाचा कारखाना सुरू करू, असे आश्वासन दिले होते. आज त्यांनी ते पूर्ण केले याचा मला आनंद आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती १००० इतकी असणार आहे. सुमारे ३५ देशांमध्ये होरिबाचे अस्तित्व आहे. या कंपनीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्राचे नवे दालन उघडले गेले असून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. होरिबालाच नाही तर बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक कंपनीला जी काही मदत लागेल ती शासनातर्फे करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. हाकू यांनी मार्च २०२० पर्यंत कारखाना सुरू करण्यात येईल, असे सांगून नागपूरला विदेशी हवाई मार्गाने जोडल्याने येथे सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. म्हणूनच कंपनीने नागपुरात उद्योग निर्मितीचा निर्णय घेतला, असेही सांगितले.