*  आवश्यक अर्हता नसतानाही प्रशिक्षण

*  शास्त्रशुद्ध आणि अचूक व्यायामाचा दावा पोकळ

निरोगी आणि सुदृढ शरीर लाभावे म्हणून शहरातील अनेक तरुण, पुरुष, महिला व्यायामशाळेत जात असून त्यासाठी व्यायामशाळेचे भरमसाठ शुल्कही भरले आहे. ही मंडळी व्यायामशाळेत तासन्तास घामही गाळत आहेत. व्यायामशाळेतील प्रशिक्षकाकडून व्यायामाविषयी शास्त्रशुद्ध आणि अचूक प्रशिक्षण दिले जाणारच, असे गृहीत धरून प्रशिक्षक सांगेल त्या पद्धतीनेच अनेकांचा व्यायाम सुरू आहे. पण असे गृहीत धरणेच अनेकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरले असून अप्रशिक्षित व्यायाम शिक्षकांमुळे शरीराची वेगळी दुखणी समोर येऊ लागली आहेत.

विकसित देशातील व्यायामशाळांमध्ये व्यायाम शिकविणाऱ्यांना विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय हे काम करताच येत नाही. भारतात मात्र याविषयी विशिष्ट धोरण नाही. परिणामी, नागपुरातील अनेक व्यायामशाळांमध्ये  आवश्यक शैक्षणिक अर्हता नसलेल्या व्यायाम प्रशिक्षकांकडून हे प्रशिक्षण दिले जात आहे. चुकीचे व्यायाम केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम जाणवायला लागले आहेत.

कुठल्याही व्यायामशाळेत व्यायाम कसा करावा, हे शिकवण्यासाठी प्रशिक्षक असतात. हे प्रशिक्षक वेट ट्रेनिंग, एरोबिक्स शिकवितात. हे शिकविताना योग्य स्नायूवर जोर पडून त्या भागाचा व्यायाम होणे अपेक्षित असते. त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक असते, मात्र अनेक व्यायामशाळांमध्ये केवळ अनुभव असल्याचा दाखला पाहून प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. अमेरिका, जर्मनीमध्ये व्यायामाशी संबंधित दीड वर्षांचा अभ्यासक्रम असून तो केल्याशिवाय कुणालाही प्रशिक्षण देता येत नाही. अभ्यासक्रमात पुस्तकी ज्ञानासह कोणत्या व्यायामामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होतो, हे शिकवले जाते. प्रात्यक्षिकावर विशेष भर देण्यासह आहाराशी संबंधित महत्त्वाची माहितीही दिली जाते. भारतात जिमबाबत काहीही धोरण नसले तरी कपाडिया फिटनेस अकादमीने (के- ११) काही अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मुंबई, पुणेसह काही ठिकाणी हे अभ्यासक्रम सुरू झाले पण त्यात वेळोवेळी काळानुरूप बदल होत नसल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

प्रशिक्षकांचेही शोषण

कमी वेळात जास्त कमाई करण्यासाठी व्यायामशाळांमध्ये येणाऱ्या सदस्यांची संख्या वाढवणे, त्यांना खासगी प्रशिक्षण (पी.टी.) घेण्यासाठी उद्युक्त करणे, वेगवेगळ्या सप्लिमेंटची ‘उपयुक्तता’ पटवून त्यांना ती घ्यायला लावणे ही सर्व कामे प्रशिक्षकांच्या माथी मारली जातात. व्यायामशाळेत प्रशिक्षक वेळेवर न आल्यास त्याचा पगार कापणे, आठ तासांपेक्षा जास्त वेळ राबवून घेणे यामुळे व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांबरोबरच   प्रशिक्षकांच्या प्रकृतीकडेही दुर्लक्ष होत असल्याचे काही प्रशिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

व्यायामशाळेतील प्रचलित प्रकार

*   वेट ट्रेनिंग

*   योगासने

*   एरोबिक्स

*   पिलॅटिस

*   केटल बेल

*   पॉवर योग

*   फंक्शनल ट्रेनिंग

*   झुंबा डान्स

सरकारने धोरण निश्चित करणे गरजेचे

व्यायामशाळा आणि त्यामध्ये व्यायाम शिकविणाऱ्या प्रशिक्षकासंदर्भात सरकारने आवश्यक अभ्यासक्रमासह धोरण निश्चित करण्याची गरज आहे. उपराजधानीतील सुमारे ९० टक्के व्यायामशाळांमध्ये सध्या असा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रशिक्षक नाहीत. ते अनुभवाच्या जोरावर प्रशिक्षण देत आहेत. या सर्वानी योग्य प्रशिक्षणासह विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यास नागरिकांना शास्त्रशुद्ध आणि अचूक व्यायाम शिकवणे शक्य होईल. चुकीच्या व्यायामामुळे कुणाचीही आरोग्याबाबत तक्रार राहणार नाही.

– अनिरुद्ध आखरे, जिम प्रशिक्षक, नागपूर</p>

(शिक्षण –  इंटरनॅशनल सर्टिफिकेट इन फिटनेस, अमेरिका)