खोदकामांमुळे वारंवार केबल तुटतात; तक्रार करूनही पोलीस, महापालिका ढिम्म

नागपूर : शिस्तबद्ध वाहतुकीसाठी शहरात सर्वत्र सिग्नल लावण्यात आले आहेत, परंतु मेट्रो, उड्डाणपूल आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे वारंवार केबल तुटत असल्यामुळे अनेक सिग्नल बंद आहेत. या बंद सिग्नलमुळे वाहनचालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत असून पोलीस व महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही प्रशासनच ढिम्मच असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.

शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात मेट्रो, सिमेंट रस्ते आणि उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे आणि अपघाताचे प्रमाण वाढले असतानाच आता बंद सिग्नलच्या नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सेन्ट्रल अ‍ॅव्हेन्यू-लिबर्टी सिनेमा ते पागलखाना चौक या रस्त्यांवरील बहुतांश सिग्नल बंद आहेत. विकासकामांसाठी करण्यात आलेल्या बॅरिकेटिंगमुळे अनेकदा चौकातून येणारी वाहने दिसत नाहीत. सिग्नल बंद असलेल्या चौकात बांधकाम कंत्राटदारांचे स्वयंसेवकही नसतात. त्यामुळे वाहनचालकांना अंदाजावर वाहन पुढे न्यावे लागते. समोरून एखादे वाहन वेगात असल्यास अपघाताची शक्यता अधिक असते. काही ठिकाणचे दिवे खराब झाल्याने सिग्नल सुटल्यानंतरही कळत नाही.  रविनगर, विद्यापीठ कॅंम्पस चौकात ही समस्या कायम आहे. या ठिकाणच्या एका बाजूचे दिवे बंद आहेत. अशा सिग्नलच्या दुरुस्तीकडेही महापालिकेकडून लक्ष दिले जात नाही.

जेसीबींमुळे तार तुटले

मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांसाठी जेसीबीद्वारे रस्ते खोदण्यात येतात. सिग्नलचे केबल लहान असते.  अनेकदा जेसीबी सिग्नलचे केबलच घेऊन बाहेर येते. अशा केबलच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला सांगण्यात येते. मात्र, वारंवार जेसीबी संचालकांकडून असे होत असल्याने महापालिकाही आता हात वर करीत असल्याची माहिती सिग्नल दुरुस्ती करणारे वाहतूक पोलीस शिपाई आसिफ शेख यांनी दिली.

शहरातील २२ सिग्नल बंद

उपराजधानीत एकूण १५७ सिग्नल आहेत. त्यापैकी १३५ सिग्नल चालू आहेत. यातील १५ सिग्नल केबल तुटण्यामुळे बंद असून ७ सिग्नल तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत. बंद सिग्नलच्या दुरुस्तीसंदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख जयस्वाल आणि सहाय्यक अभियंता मानकर यांच्याशी कार्यालयात भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पोलीस कर्मचाऱ्यांची पंचाईत

सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ६ यादरम्यान शहराच्या अनेक रस्त्यांवर वाहनांच्या गर्दीत पोलिसांना वाहतूक नियंत्रण करावे लागते. सिग्नल बंद असल्याने पोलीस मधोमध उभे राहून हातवाऱ्याने वाहतूक नियंत्रित करताना दिसतात. मात्र, नियमित एक ते दोन तास उभे राहून हातवारे करणे शक्य नसते. अनेकदा नैसर्गिक क्रियांसाठीही पोलिसांना चौक सोडावे लागते. परिणामी, वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तात्पुरते बंद सिग्नलच्या दुरुस्तीसाठी वाहतूक पोलिसांनी एक पथक नेमले आहे. मात्र, कायमस्वरूपी बंद सिग्नलच्या दुरुस्तीचे काम महापालिकेलाच करावे लागणार आहे.