चंद्रशेखर बोबडे

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा (बदललेले नाव-हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) नागपूर ते शिर्डी दरम्यानचा टप्पा एक मेपासून सुरू करण्याची  घोषणा खुद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली असली तरी या महामार्गाचे नागपूरजवळील प्रारंभस्थळापासून १०० किलोमीटरचे काम अजूनही अपूर्ण असल्याने तो दिलेल्या वेळेत सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची घोषणा केली होती. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या महामागाला बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव दिले. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या एकूण ७०१ किलोमीटर महामार्गाचे काम १६ टप्प्यात विभागून ते विविध कंत्राटदार कंपन्यान्यांच्या माध्यमातून सुरू आहे. मागील वर्षीच्या  टाळेबंदीचा या कामाला फटका बसला.

डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महामार्गाच्या अमरावती जिल्ह््यातील कामाला भेट देऊन पाहणी केली होती. नागपूर ते शिर्डी दरम्यान ५०० किलोमीटरचा रस्ता एक मेपासून वाहतुकीसाठी खुला करणार असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या भाषणात याचा पुनरुच्चार केला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह््यातील हिंगणा तालुक्यातील महामार्गाच्या  प्रारंभस्थळापासून ६० किलोमीटरच्या कामांची (नागपूर ते खडकी ३० किलोमीटर व दुसरा ३१ ते ६० किलोमीटर वर्धा जिल्ह््यापर्यंत) प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रारंभस्थळासह अनेक पुलांची कामे अपूर्ण असल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यात रस्त्यावर मुरूम टाकण्याचे तर दुसऱ्या टप्प्यात केळझरनजीकच्या भागात सिमेंटीकरण झाल्याचे दिसून आले असले तरी तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या स्थितीत नाही. फक्त एक महिना शिल्लक आहे. या काळात उर्वरित कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येते. नागपूरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ३० किलोमीटरच्या टप्प्याला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे तेथील कंत्राटदारांनी सांगितले. या परिस्थितीत मे महिन्यापासून रस्ता वाहतुकीसाठी खुला कसा करणार, हा प्रश्न आहे. या महामार्गामुळे सात तासात नागपूरहून मुंबईला पोहचता येणार असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ७०१ कि.मी. लांबीचा मेगा प्रकल्प आहे. अनेक आव्हानांवर मात करीत या प्रकल्पाचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी रस्ता सुरू करण्यापूर्वी प्रवाशांसाठी अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

– राधेश्याम मोपलवार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय  संचालक, म.रा. रस्ते विकास महामंडळ.