अकोला, अमरावतीत जोरदार तयारी

कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर मराठवाडय़ात निघालेल्या मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्चाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असतानाच आता अशाच प्रकारच्या मोर्चाचे लोण विदर्भातही पसरू लागले आहे. प्रथम अकोल्यात व नंतर अमरावतीत मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

कोपर्डी बलात्कार घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले. सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला. सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ मराठवाडय़ात मराठा समाजाने मूक मोर्चे काढून शक्तीप्रदर्शन केले. एका पाठोपाठ एक निघणाऱ्या लाखोंच्या मोर्चानी राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चामुळेच अ‍ॅक्ट्रॉसिटी कायद्यात दुरुस्तीचा मुद्दा नव्याने चर्चेत आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, त्यापूर्वी राज ठाकरे यांनी यासंदर्भात केलेली थेट मागणी, दलित नेत्यांनी केलेला विरोध, यामुळे या मुद्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. याचा थेट संबंध हा मराठा समाजाच्या मोर्चाशी असल्याने त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. आता हे लोण विदर्भात दाखल होत आहे. येत्या १९ सप्टेंबरला अकोल्यात मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे.

प्रथम मराठा आरक्षण आणि अ‍ॅक्ट्रॉसिटीचा दुरुपयोग, यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. मात्र, समाजाचे नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेल्याने ते या मुद्यावर क्वचितच एकत्र आल्याचे चित्र होते. कोपर्डीच्या घटनेनंतर मात्र संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याने आता नेतेही पक्षाची सीमा ओलांडून पुढे येताना दिसत आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्य़ात मराठा-देशमुख-कुणबी समाजाचे प्राबल्य आहे, त्यामुळेच विदर्भात मोर्चे काढताना सर्वप्रथम या दोन जिल्ह्य़ांची निवड करण्यात आली आहे.