मराठा आरक्षण: बसवर दगडेफक

मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या महाराष्ट्र बंदला नागपुरात अल्पप्रतिसाद मिळाला. शहरातील काही भागात अशंत: बंद वगळता सर्वत्र बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये आणि वाहतूक सुरू होती. मात्र सक्करदरा, महाल आणि गणेशपेठ बसस्थानकात काही काळ तणावाची स्थिती होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. मंगळवारी  सकाळी नागपुरात देखील आंदोलन करण्यात आले. महालातील शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून आणि औरंगाबाद येथे जलसमाधी आंदोलनात मृत्युमुखी पडलेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण  करून आंदोलनाला सुरुवात झाली.

कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन केले. महालातून जाणाऱ्या एका खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली. यात बसेसच्या काचा फुटल्या. बस देखभाल-दुरुस्तीकरिता जात होती. त्यात प्रवासी नव्हते. सुमारे अर्धा ते एक तास ठिय्या देण्यात आला. आंदोलक एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत होते. शिवाजी पुतळा, गांधीजवळ रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे थोडावेळ वाहतूक खोळंबली होती.

तेथून आंदोलक  सक्करदरा येथे आले. सक्करदरा चौकातील काही दुकाने, भाजीबाजार बंद करण्याचा प्रयत्न केला. यातील काही कार्यकर्त्यांना सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतेल. येथील भाजी बाजार देखील काही वेळासाठी बंद करण्यात आले.

गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक चौकात आंदोलकांनी निदर्शने केली आणि ठिय्या दिला. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही कोळ बस वाहतूक ठप्प होती. नंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आंदोलनात राजा जयसिंग भोसले, प्रशांत भोसले, मिलिंद साबळे, पिंटू पवार, प्रवीण खंडागळे, नगरसेवक बंटी शेळके, नगरसेविका हर्षला साबळे, मेघा शिंदे, कविता भोसले, सोनिया साबळे, हेमंत शिर्के, आकाश पवार, अमोल माने, प्रशांत निकम आदी सहभागी झाले होते.