News Flash

मुख्यमंत्र्यांच्या शहरात मराठय़ांचा हुंकार

मोर्चातील मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे शहर, असा दुहेरी मुकुट लाभलेल्या नागपुरात मराठा क्रांती मूक मोर्चाने मंगळवारी निशब्द हुंकार भरला. मोर्चापूर्वी मराठा-कुणबी असा वाद निर्माण झाल्याने इतर जिल्ह्य़ांतील गर्दीच्या उच्चांकाच्या स्पर्धेत नागपुराचा मोर्चा मागे पडला. या मोर्चासाठी जिल्ह्य़ाभरातून समाजबांधव आले होते. मोर्चात मुस्लीम बांधवही सहभागी झाले होते. याशिवाय, इतर जातीधर्माच्या युवक-युवतींचा सहभाग दिसून आला.

रेशीमबाग मैदानातून निघालेला हा मोर्चा महाल, गांधी गेट, शुक्रवारी तलाव, लोखंडी पूल, गणेश टेकडीमार्गे संविधान चौकात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर कस्तुरचंद पार्कवर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोर्चा पोहोचला.

यानंतर मोर्चातील मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या मोर्चात श्रीमंत मुधोजीराजे भोसले, संग्रामसिंग भोसले, माजी मंत्री रणजित देशमुख, विदर्भवादी ज्येष्ठ जांबुवंतराव धोटे, माजी मंत्री अनिल देशमुख आदी मंडळी सहभागी झाली होती.

समाज धडा शिकवेल

मराठा-कुणबी असा वाद नाही, परंतु मराठय़ांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी प्रयत्न केला. त्यांना मराठा समाज निवडणुकीत धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया मुधोजीराजे भोसले यांनी दिली.

कोपर्डीच्या घटनेविरुद्ध आक्रोश

मराठा मोर्चाला बदनाम करण्यासाठी काही लोक अ‍ॅट्रॉसिटी आणि मराठा आरक्षण, यावर अधिक चर्चा करतात, पण कोपर्डीतील अत्याचाराबाबत कुणी बोलत नाही. आपल्या बहिणीला न्याय मिळावा, अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी, अशी मागणी करणारे आम्ही जातीयवादी कसे, असा आक्रोश राणी साठे या युवतीने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:31 am

Web Title: maratha kranti morcha cm devendra fadnavis nagpur city
Next Stories
1 युवा मतांसाठी भाजपाची ‘खेळी’
2 नगरपालिका निवडणुका : खर्च मर्यादेवर नाराजीचे सूर
3 दिवाळीत रेल्वेगाडय़ा फुल्ल
Just Now!
X