वन्यजीवांवर विपरीत परिणाम; लहान जलस्रोत विकसित करण्याची जाणकारांची मागणी

वन्यजीवांच्या भरवशावर भरमसाट महसूल गोळा करायचा, पण त्याच जीवांसाठी नैसर्गिक वातावरण टिकवून ठेवण्याकडे मात्र पाठ फिरवायची आणि त्या वन्यजीवाला कृत्रिम वातावरणाची सवय लावायची, अशीच भूमिका अलीकडच्या काळात वनखात्याची राहिली आहे. उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी केली जाणारी व्यवस्था याच प्रकारात मोडणारी आहे. नैसर्गिक जलस्रोताचे जतन न करता सिमेंटचे कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा वनखात्याने घातलेला घाट यामागे फार मोठे अर्थकारण दडल्याची टीका होत आहे.

वनखात्यात काम करण्यासाठी ज्या काही बाबींचे ज्ञान असणे गरजेचे आहे, त्याचे प्रशिक्षण वनखात्यात भरती होत असताना दिले जाते. यात जल:पुनर्भरण आणि जलव्यवस्थापन याचाही समावेश आहे. याअंतर्गत नैसर्गिक स्रोत कसे जिवंत ठेवायचे, त्याची काळजी कशी घ्यायची या सर्व बाबींचा अंतर्भाव होतो. गेल्या १५-२० वर्षांत नैसर्गिक पाणीव्यवस्थापन मात्र पूर्णपणे कोलमडले आहे. जंगलाच्या बाहेरचे तर कोलमडले आहे, पण जंगलातले त्याहूनही कोलमडले आहे. नैसर्गिक ठेवा जपण्याऐवजी कृत्रिम बाबींची सवय वन्यप्राण्यांना लावून दिली जात आहे. पूर्वीच्या काळात नैसर्गिक पाणवठय़ाचे व्यवस्थापन करण्याचा प्रकारच आता पूर्णपणे बंद झाला आहे. राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान तसेच राखीव जंगलात कृत्रिम पाणवठय़ांना आलेला ऊत फार मोठय़ा अर्थकारणावर शिक्कामोर्तब करणारा आहे. वनरक्षकांच्या माध्यमातून पाणी अडवून ते जिरवले पाहिजे, वर्षभर नैसर्गिक जलस्रोतांचे व्यवस्थापन नीट राखले गेले पाहिजे. आता तर वनखात्याने गावकऱ्यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या समित्या तयार केल्या आहेत. त्या समित्यांच्या माध्यमातूनही ही कामे केली जाऊ शकतात. मात्र, कृत्रिम पाणवठय़ांचे, त्यावर बोअरवेल खोदून सौरऊर्जा लावून पाण्याच्या व्यवस्थेचे कंत्राट कुणाला तरी द्यायचे, लक्षावधी रुपयांची उलाढाल त्यात करायची आणि आपलेही हित साध्य करायचे, असाच प्रकार सध्या वनखात्यात सुरू झाला आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटनावर भर देणाऱ्या वनखात्याने वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाची पूर्णपणे नासधूस केली आहे. पर्यटकांची वाहने फिरणाऱ्या रस्त्यावर कृत्रिम पाणवठय़ांची निर्मिती करून या पाणवठय़ांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांचे दर्शन पर्यटकांना घडवायचे आणि त्यातून मिळणारा महसूल खिशात घालायचा. राज्यातल्या फार कमी जंगलात नैसर्गिक जलस्रोत पर्यटकांच्या मार्गावर आहेत. म्हणूनच रस्त्यांच्या बाजूला कृत्रिम पाणवठय़ांची निर्मिती करण्याचा घाट वनखात्याने घातला आहे. या अर्थकारणाचा विपरीत परिणाम मात्र वन्यप्राण्यांच्या वागणुकीवर झाला आहे.

वन्यजीवांच्या हक्कांवर आक्रमण

राज्यातल्या अनेक व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानात पर्यटक संकुल जंगलातल्या जलस्रोतांच्या म्हणजेच तलावांच्या आसपास आहेत. त्यामुळे ज्या पाण्यावर वन्यजीवांचा हक्क आहे, ते पाणी पर्यटकांच्या वाटय़ाला जात आहे. एका पर्यटकाला दिवसभरात किमान ३० लिटर पाणी लागते आणि दररोज शेकडोंच्या संख्येने पर्यटक असतात. यातूनही वन्यजीवांच्या नैसर्गिक हक्कांवर पर्यटकांचे आक्रमण होते.

कृत्रिम पाणवठय़ांची सवय चुकीची

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत संरक्षित क्षेत्रातील नाल्यावर ऑक्टोबर महिन्यात ३३ फूट अंतरावर मातीचे बांध घातले जातात. त्यामुळे जंगलातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी जमिनीत मुरते. पाण्याचा एक थेंबसुद्धा संरक्षित क्षेत्राच्या बाहेर जात नाही. तसेच डोंगराच्या पायथ्याशी तळी दिसू लागतात आणि हे पाणी वन्यप्राण्यांना वर्षभर पुरेसे असे. असे मातीचे बांध घालणे आता बंद झाले आहे आणि कृत्रिम पाणवठय़ांची सवय वन्यप्राण्यांना लावली जात आहे, अशी खंत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी अलीकडेच ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केली होती.

‘माथा टू पायथा’ ही जुन्या काळातली पद्धत अतिशय कमी खर्चाची होती. सिमेंटचे कृत्रिम पाणवठे तयार करणे म्हणजे फार मोठय़ा खर्चाची बाब आहे. सिमेंटच्या कृत्रिम पाणवठय़ात आधी टँकरने पाणी आणून टाकले जात होते. नंतर त्याच ठिकाणी बोअरवेल खोदून सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी भरले जाते. सौरऊर्जेचा वापर करून केलेले पाणव्यवस्थापन योग्य आहे, पण जिथे खडकाळ क्षेत्र आहे आणि पर्यायच नाही, अशा ठिकाणीच ते वापरले पाहिजे. ‘माथा टू पायथा’ म्हणजेच वरून पडणारे पाणी अडवणे याच पर्यायाचा वापर व्हायला हवा. कळमेश्वरच्या जंगलात हा प्रयोग आम्ही यशस्वी केला आहे. म्हणूनच व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान अशी कोणतीही बिरुदावली नसलेल्या या जंगलात वाघांचा आणि इतरही वन्यप्राण्यांचा मुक्त वावर आहे.    कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक

पर्यटनावर वनखात्याने दिलेला अधिक भर नैसर्गिक जलस्रोतांच्या ऱ्हासासाठी कारणीभूत आहे. पर्यटकांच्या माध्यमातून महसूल गोळा होतो म्हणून कृत्रिम पाणवठय़ांची निर्मिती जंगलात फिरणाऱ्या पर्यटकांच्या मार्गावर करायची. त्यामुळे या पाणवठय़ावर येणाऱ्या वन्यप्राण्यांचे दर्शन पर्यटकांना होईल आणि अधिकाधिक पर्यटक जंगलाकडे आकर्षित होतील. मात्र, यामुळे वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक सवयींचा ऱ्हास होऊन ते माणसाळले जातात आणि हे अतिशय चुकीचे आहे. त्याऐवजी जंगलातलेच पाण्याचे लहान-लहान स्रोत विकसित करणे गरजेचे आहे.   यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक