‘मराठीची काळजी वाहणाऱ्या तमाम साहित्यकारांनो तसेच भाषेच्या पालखीचे भोई झालेल्या आयोजकांनो, कार्यक्रमाला लोक येत नाहीत म्हणून ओरडता कशाला? मराठी माणसाच्या जेवण व वामकुक्षीच्या वेळा तुम्हाला ठाऊक नाहीत काय? आधी स्वार्थ व मग परमार्थ या मराठमोळ्या वृत्तीशी तुम्ही परिचित नाही काय? रिकाम्या खुच्र्याना उद्देशून बोलण्याची सवय तुम्हीच स्वत:ला लावून घेतली आणि आता आमच्या नावाने खडे का फोडता?’ कुठेही पॉज न घेता मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केलेले हे वाक्य वारंवार ऐकून व बघून मोरू मोहरून गेला. उठसूठ कार्यक्रम आयोजित करून तो फसला की अशाने मराठी अभिजात कशी होणार, अशी भूमिका  घेणाऱ्या महामंडळवाल्यांमुळे सध्या मोरू चांगलाच संतापला आहे. स्वत:च्या अपयशाला दुसरे जबाबदार, ही वृत्ती अलीकडे मराठी माणसात वाढत चालली की काय, अशी शंका त्याला यायला लागली आहे. त्याची भाषा अजिबात शुद्ध वगैरे नाही. अनेकदा  इंग्रजी  शब्दांचा वापर तो करतो. त्याला अभिजात मराठी वगैरे फार समजत नाही, पण मराठीवर त्याचे प्रेम आहे. या प्रेमालाच आव्हान देण्याचा प्रयत्न सध्या उपराजधानीत होत असल्याने आयोजकांना जाऊन जाब विचारावा, असे त्याला तीव्रतेने वाटू लागले आहे. आजवर कायम श्रोत्याच्या भूमिकेत वावरलेला मोरू जाब विचारण्याची प्रॅक्टिस मोबाईलवर करतो आहे. त्याच्या या उपद्व्यापाकडे फणकाऱ्याने बघणारी बायको सध्या शांत आहे. मध्ये मध्ये याला अशीच हुक्की येते हे तिला ठाऊक आहे. बोलण्याचा सराव करणाऱ्या मोरूच्या डोक्यात अनेक विचारांनी गर्दी केली आहे. एका सारस्वताच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात अवघे ३५ श्रोते होते म्हणून मंडळवाले चिडले व नको ते बोलून गेले. नागपुरी उन्हात दुपारी बारा वाजता कार्यक्रम ठेवायचा आणि गर्दीची अपेक्षा ठेवायची, हा कुठला न्याय? अरे, तीन आयोजक संस्थांचे सर्व पदाधिकारी तरी हजर होते का कार्यक्रमाला, याचे उत्तर द्या ना आधी. या अशा प्रश्नांनी मोरूचा मेंदू थरथरतो आहे. नवे काही ऐकायला मिळणार असेल तर लोक नक्की येतात. तेच तेच जागतिकीकरण, भांडवलीकरण, समाजावर झालेले दुष्परिणाम कितीदा ऐकायचे? आजकाल डोक्याला चिंता वाढवणाऱ्या गोष्टी नकोशा असतात, हे या आयोजकांना कधी कळणार? वरून हेच आयोजक पुन्हा मी महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, लक्ष देऊन ऐका असे वारंवार सांगणार. अहो, जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ती आमच्यासाठी असेल, हे कसे काय गृहीत धरता. या प्रश्नाचा विचारच ही मंडळी करत नाही. लोकांनी गर्दी केली तरच मराठी भाषा अभिजात होईल, अन्यथा नाही, हा तर्कच मूळात भुसभुसीत आहे. उद्या तुम्ही मराठीच्या व्याकरणावर चर्चासत्र ठेवाल आणि गर्दीची अपेक्षा कराल तर ते कसे शक्य आहे. केवळ साहित्यविषयक कार्यक्रमाला लोकांनी प्रतिसाद दिला तरच मराठीला अभिजात  दर्जा मिळेल, अन्यथा नाही हा विचारच संकुचित आहे. अनेकांना याच भाषेत होणारे इतर कार्यक्रम आवडतात. कुणाला राजकीय तर कुणाला सामाजिक कार्यक्रमाला जावेसे वाटते. कुणाला मराठी गाण्याचे कार्यक्रम आवडतात तर कुणाला कौटुंबिक समस्यांविषयक भाषणे ऐकायला आवडते. तिथे जे लोक गर्दी करतात, त्यांना मराठीप्रेमी समजायचे नाही का? मनात वाढणारी प्रश्नांची गर्दी बघून मोरू आणखी अस्वस्थ झाला व घरातल्या घरात येरझारा मारू लागला. ते करताना त्याचे आवेशातील हातवारे बघून त्याची दोन्ही मुले लगेच दुसऱ्या खोलीत पळाली व व्हॉटस्अ‍ॅपमध्ये दंग झाली. बायकोने थोडी भांडी आपटून बघितली, पण मोरूची त्वेषपूर्ण तंद्री काही भंगली नाही. रिकाम्या खुच्र्या बघून संतापलेले मंडळवाले प्राध्यापकांवर घसरले. रसिकता न जोपासणाऱ्या या प्राध्यापकांचे पगार कमी करा. दीड लाखाहून २५ हजारावर आणा, तेव्हाच ते कार्यक्रमाला गर्दी करतील. काय अजब तर्कट मांडतात हे मंडळवाले! पगार कमी करणे म्हणजे पोटाला चिमटा काढणे. आता पोटावर पाय दिला की प्राध्यापक मराठीवर प्रेम करायला लागतील, कार्यक्रमाला धावून धावून येतील हे अजहबच तर्कट म्हणायचे. कमी पगार असलेले कर्मचारी रसिक असतात व जास्त पगार असलेले अरसिक ही महामंडळांची नवी व्याख्या आहे की काय? आजकाल ३० लाखाचे डोनेशन मोजून लोक प्राध्यापक व्हायला लागलेत. अशी माणसे कशाला मराठीचा विचार करतील? आणि तो करून त्यांचे काय भले होणार आहे? शिकवण्यासाठी त्याने थोडीच लाखो मोजले आहेत. ते वसूल करण्यासाठी तो पगार घेतो आहे. हे साधे वास्तव या मंडळवाल्यांना कळू नये हे अतिच झाले! तसेही ही मंडळी नेहमी आभासी जगात वावरत असतात. त्यांची वक्तव्ये ऐकली की याची खात्री पटते. अधिकार कवडीचा नाही आणि तोंडपट्टा बघा कसा सुटलेला, याच भावनेतून या मंडळवाल्यांकडे बघितले जाते. अहो, प्राध्यापकांनी मराठीची काळजी वाहण्याचे दिवस गेले. आता चार प्राध्यापक मिळून एक वर्तमानपत्र वाचण्याचे दिवस आलेत. शिवाय परीक्षा, खोटे प्रबंध, ढापलेले लेख तयार करणे, त्यावरून नॅकसाठी गुण मिळवणे, यासाठी वेळ हवा ना! तोच पुरत नाही आणि तुम्ही साहित्यविषयक कार्यक्रमाला प्राध्यापक येत नाही, अशी ओरड करता आणि त्यांनी यावे तरी कशाला? उजळणी वर्ग असो वा विद्यापीठातील कार्यक्रम, तिथे तुम्हा सर्वाची भाषणे ऐकून बिचारी बोअर झालेली आहेत ही मंडळी. आताशा तर तुम्ही काय बोलणार हे आधीच सांगू लागतात हे प्राध्यापक. जे वारंवार ऐकले आहे तेच ऐकले की झोप येणार आणि झोपले की तिकडून तुम्हीच बोलणार, बघा कार्यक्रमाला आलेले प्राध्यापक कसे झोपतात. त्यापेक्षा प्राध्यापक कक्षात समोरची खुर्ची ओढून पाय सरळ केले की छानपैकी ताणून देणे केव्हाही योग्य. असा व्यावहारिक विचार करावा लागतो अन्यथा तुम्ही मंडळवाले, चार वर्षांनी मिळालेली संगीत खुर्ची कशी सांभाळू, किती बोलू, कुठे बोलू, काय बोलू, कसे बोलू, कुणाला लघुसंदेश पाठवू या विवंचनेत असता. साऱ्या मराठीचा भार जणू आपल्याच डोक्यावर आला आहे, अशा भ्रमात सदैव गंभीर व मख्ख चेहऱ्याने वावरत असता. विचार करून उद्भवलेल्या असंख्य प्रश्नांवर मनातल्या मनात विचार करून मोरू थकला. त्याने गुबगुबीत सोफ्यात स्वत:ला झोकून दिले. नवऱ्याचे हे दशावतार बघून त्याची बायको त्याच्यावर चांगलीच खेकसली ‘बंद करा हे चाळे, एवढेच वाटते तर जा त्या मंडळवाल्यांकडे आणि चांगली सटक काढून परत या’ या धारदार वाक्याने मोरू भानावर आला आणि त्याचा संताप मनातल्या मनात थिजून गेला.

devendra.gawande@expressindia.com