शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बांगलादेशींना मुंबईतून हाकलण्याबाबत आग्रही होते. त्यांची शेवटपर्यंत हीच भूमिका होती. मात्र आताची शिवसेना सत्तेसाठी बदलली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी आणि मराठी माणूस नाराज आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. रविवारी प्रसारमाध्यमांशी ते नागपुरात बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून टीका होत असताना शिवसेना सत्तेत काँग्रेससोबत असल्यामुळे गप्प बसली आहे. काँग्रेसच्या विरोधात विधान केले तर ते पाठिंबा काढून घेतील, अशी भीती उद्धव ठाकरे यांना वाटते. केवळ सत्ता आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी हिंदुत्व, मराठी माणूस हे सगळे मुद्दे सोडून दिले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष आमच्या विरोधात एकवटले याचा अर्थ आम्ही बलवान आहोत.

सरकारमधील तीनही पक्षांच्या विचारांत ताळमेळ नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहे,अशी वक्तव्ये शिवसेनेचे नेते करतात. मात्र काँग्रेसने जर सावरकरांच्या विरोधात भूमिका घेऊन वक्तव्य केले असताना शिवसेनेला सत्तेसाठी लाचारी करावी लागत आहे. आपले विचार सोडावे लागत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असेही गडकरी म्हणाले. पाकिस्तानामध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे. शीख समाजावर हल्ला होत आहे. जेव्हापासून पाकिस्तानाची निर्मिती झाली तेव्हापासून तेथे अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे. त्याचे काँग्रेसकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप गडकरी यांनी केला.