विदर्भातील साहित्यिकांना झाले तरी काय? कधी कुणाचा दुराग्रह चर्चेचा विषय ठरतो, तर कधी कुणी मराठी माणसांची लायकी काढतो. टाय व कोट घालून सारस्वतांच्या वर्तुळात वावरणाऱ्या या मंडळीकडून उचलली जीभ व लावली टाळ्याला अशा वर्तनाची अजिबात अपेक्षा नाही. ज्यांच्याकडे प्रतिभावान म्हणून बघायचे, त्यांनीच बालहट्टाच्या पातळीवर उतरावे हेही अनपेक्षित असेच आहे. तरीही असे घडत असेल तर या प्रतिभावंतांकडे सामान्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तर चुकला नाही ना, अशी शंका यायला लागते. ज्यांच्याकडून समाजाला मार्गदर्शनाची अपेक्षा असते, त्यांनाच चार शब्द ऐकवण्याची वेळ यावी हे खरे तर दुर्दैवीच, पण या स्थितीला हे साहित्यिकच जबाबदार आहेत हेही तेवढेच खरे! सुधाकर गायधनी हे कवी म्हणून मोठे. त्यांना महाकवीची उपाधी कुणी दिली हे अजून अनेकांना ठाऊक नाही. तरीही सर्वानी विनातक्रार त्यांना या उपाधीसकट स्वीकारले. हे स्वीकारणे गायधनींनी गृहीत धरले की काय, अशी शंका यावी असा त्यांचा ताजा त्रागा आहे. आयुष्यभर विदर्भ साहित्य संघाला शिव्या देण्यात धन्यता मानणाऱ्या या कवीने संघाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. संघ आणि गायधनी या दोघांच्या संमतीने हा साहित्य व्यवहार घडला, हे कळल्यावर या शंकेखोरांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. मात्र ते समाधान फार काळ टिकू शकले नाही. क्षुल्लक कारणाहून अध्यक्षपद नाकारून गायधनी आनंद यादवांच्या पंक्तीत जाऊन बसले. संमेलनात येऊ इच्छिणारी विठ्ठल वाघ, ज्ञानेश वाकूडकर ही कवीमंडळी त्यांना ‘सवंग’ वाटली. सवंग या शब्दाची नेमकी कोणती व्याख्या गायधनींना अपेक्षित आहे? शेतकऱ्यांची व्यथा समर्थ शब्दात मांडणारे विठ्ठल वाघ चहाच्या टपरीवरही चाहत्यांना खूष करण्यासाठी कविता म्हणतात हे गायधनींना सवंग वाटते का? एखाद्या प्रतिभावंताची उंची त्याच्या लेखनावरून मोजायची की वर्तनावरून? साहजिकच लेखनावरून, हेच त्याचे उत्तर आहे. गायधनींचे उत्तर काही वेगळे आहे का, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. स्वभावातील त्रुटींकडे दुर्लक्ष करत सुरेश भटांसारख्या श्रेष्ठ कवीवर प्रेम करणारा हा प्रदेश आहे हे गायधनी विसरले की काय, अशी शंका आता यायला लागली आहे. ज्ञानेश वाकूडकर राजकारणी आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, शिवाय ते कवीही आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नको म्हणून वणवण भटकणारा हा माणूस आब राखून वागणारा आहे. तेही सवंगाच्या यादीत येत असतील तर गायधनींनी या शब्दाचा अर्थ आणखी स्वस्त करून टाकला आहे, असा निष्कर्ष सहज काढता येतो. कायम बहुजनांचा कैवार घेणाऱ्या गायधनींना संघाची संमेलने कशी होतात, त्यात कोण सहभागी होते हे ठाऊक नाही, अशातलाही भाग नाही. या संमेलनात संघवर्तुळात वावरणाऱ्या अनेकांना हमखास स्थान मिळते हेही त्यांनी बघितले आहे आणि त्यात गैर काहीही नाही. कोणतीही संस्था साहित्यव्यवहाराच्या नावावर हेच करते. तरीही अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शांतपणे हा सन्मान भोगणे हेच गायधनींनी करायला हवे होते. तसे न करता पदत्याग करून त्यांनी स्वत:चेच हसे करून घेतले आहे. तसेही अशा संमेलनात अध्यक्ष म्हणून वावरताना कळसूत्री बाहुलीसारखेच राहावे लागते. आयोजक म्हणतील तसे वागावे लागते. त्यामुळे गायधनीसारख्या कवीने या पदाच्या मोहात पडायलाच नको होते. तरीही त्यांना तो झाला आणि परत फिरताना त्यांना बाणेदारपणा दाखवण्यासाठी योग्य मुद्दाही सापडला नाही, हे त्यांचे दुर्दैवच म्हणायला हवे. दुसरे उदाहरण डॉ. अक्षयकुमार काळेंचे आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या या समीक्षकाने परवा चक्क मराठी माणसाची लायकी काढली. निमित्त होते मराठीला राजभाषेचा दर्जा कधी मिळणार, या प्रलंबित प्रश्नाचे! पंतप्रधान मोदींना भेटण्याच्या विषयावरून त्यांनी ही लायकी काढली. तसाही सध्या सर्वात स्वस्त कुणी असेल तर तो मराठी माणूस आहे. कुणीही येतो व उठसूठ त्याला चार शब्द सुनावत राहतो. आता त्यात काळेंची भर पडली. संमेलनाध्यक्षपद मिळाल्यावर हे साहित्यिक असे सुसाट का सुटतात? आपण काय बोलतो याचे भान त्यांना का राहात नाही? मराठी माणूस मोदींना भेटण्याच्या लायकीचा नाही, हे ते कशाच्या आधारावर ठरवतात? स्वत:ही काही करायचे नाही आणि ज्या समूहातून आपण आलो तोच लायकीचा नाही असे म्हणायचे, हा प्रतिभासंपन्नतेचा कोणता अविष्कार समजायचा? असे अनेक प्रश्न काळेंच्या विधानाने उपस्थित झाले आहेत. आता काळे म्हणतात, मी त्या लायकीचा नाही असे म्हणायचे होते. तुम्हीच जर मोदींना भेटण्याच्या लायकीचे नसाल तर समग्र सारस्वतांनी कणाहीन अध्यक्ष निवडून दिला असाही त्याचा एक अर्थ निघतो. तो काळेंना मान्य आहे का? मूळात प्राध्यापकांच्या स्वभावातच एक भिडस्तपणा दडलेला असतो. त्यातून काळे असे बोलले नाहीत ना! अशी शंका घ्यायला जागा आहे. अशी विधाने केवळ काळेंची नाही तर त्यांच्या मागे चिकटलेल्या पदांची शोभा घालवत असतात. सध्या तर उंचीवरची माणसे खुजी वाटण्याचा काळ आला आहे. ज्यांच्याकडे आशेने बघावे त्यांचे बरळणे व बालहट्ट चर्चेचा विषय ठरू लागले आहेत. एकेकाळी साहित्य वर्तुळाविषयी समाजात कमालीचा आदर होता. प्रतिभावंतापुढे नतमस्तक होण्याचे दिवस आता संपले आहेत. उलट त्यांची कृतीच टिंगलटवाळीचा विषय ठरू लागली आहे. म्हणूनच शिवाजीराव मोघेंसारखा पराभूत राजकारणी साहित्यिकांची दारू काढतो. काहींचा अपवाद सोडला तर एकाही सारस्वताला त्यावर मोघेंना जाब विचारण्याची हिंमत होत नाही. पैसे खाऊन सुद्धा भ्रष्टाचारमुक्तीची व्याख्याने राजकारणी कशी काय झोडू शकतात, असा प्रश्न विचारण्याची धमक कुणी दाखवत नाही. चुकीच्या गृहतकावर आधारलेल्या मोघेंच्या वक्तव्यावर टाळ्या पडतात. यावरून सारस्वतांच्या वर्तुळाविषयी समाजात किती अनादर आहे हेच दिसून येते. साहित्यवर्तुळाची घसरत चाललेली पत हा अजूनही या वर्तुळाला चिंतेचा विषय वाटत नाही. माझा सन्मान, माझा हट्ट, माझे लेखन यात आत्ममग्न झालेल्या या साहित्यिकांना समोरचे सारेच तुच्छ असे वाटू लागते. त्यामुळेच त्यांच्या तोंडून अशी वक्तव्ये, असे दुराग्रह बाहेर पडू लागतात. यापेक्षा तर मोरू परवडला, त्याने या सारस्वतांच्या वर्तुळावर फुलीच मारली आहे व त्यामुळेच तो आनंदी आहे.

devendra.gawande@expressindia.com