स्वतंत्र विदर्भासाठी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करण्याचा इशारा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ‘विदर्भ देता की जाता’ अशी मागणी करत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चासमोर सत्तापक्षातील एकही नेता न आल्यामुळे विदर्भवादी नेत्यांनी १ जानेवारीपासून रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करण्याचा इशारा देत सरकारचा निषेध केला. ११ जानेवारीला विदर्भातील अकरा जिल्ह्य़ातील महामार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

स्वतंत्र विदर्भाची मागणी करत विदर्भातील अकरा जिल्ह्य़ातून निघणाऱ्या दिंडय़ा नागपूरला पोहोचल्यानंतर विदर्भवादी नेते वामनराव चटप आणि राम नेवले यांच्या नेतृत्वाखाली यशवंत स्टेडियमपासून विधानभवनावर मोर्चा काढण्यात आल्यानंतर टी पॉईंटजवळ अडविण्यात आला. यावेळी विविध नेत्यांची भाषणे होत असताना मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यातील मंत्र्यांनी मोर्चाला सामोरे येऊन पंतप्रधानाच्या नावाने देण्यात आलेले निवेदन स्वीकारावे, अशी मागणी केली मात्र, एकही मंत्री मोर्चाला सामोरे आला नसल्यामुळे मोर्चातील कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत घोषणा दिल्या. स्वतंत्र विदर्भ देऊ, असे आश्वासन देणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकरामधील विदर्भवादी नेते मौनीबाबा झाले आहेत. त्यामुळे विदर्भाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रवादी नेत्यांनी विदर्भातून चालते व्हा, अशा घोषणा देत विदर्भाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यावेळी वामनराव चटप म्हणाले, राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्य सरकार स्वतंत्र विदर्भ देण्याची भाषा करीत असताना केंद्रात मात्र विदर्भाचा विषय अजेंडय़ावर नसल्याचे सांगत आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील जनता आता येणाऱ्या दिवसात भाजपच्या या दुहेरी भूमिकेला तीव्र आंदोलन करून उत्तर देणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ राज्य देण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे, मात्र आता ते मौनीबाबा झाले आहेत, अशी टीका चटप यांनी केली. विदर्भातील जनतेला दिलेली आश्वासने गेल्या अडीच वर्षांत फोल ठरली असून त्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने कुठलाच निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या, ग्रामीण भागातील कोसळलेली अर्थव्यवस्था, शेतीमालाचे पडलेले भाव आदी ज्वलंत प्रश्नांवर सरकारची भूमिका मौनीबाबासारखी झाली आहे. विधानभवनावर काढण्यात आलेला मोर्चा ही या वर्षांतील अंहिसात्मक शेवटची लढाई असून १ जानेवारीपासून अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, सत्ताधाऱ्यांनो विदर्भ देता की जाता, अशी घोषणा करीत रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी चटप यांनी दिला. ३१ डिसेंबपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारला विदर्भ राज्य करण्यासंदर्भात मुदत देण्यात आली, मात्र स्वतंत्र तेलंगणासाठी जसे आंदोलन करण्यात आले त्याच आधारावर आंदोलन केले जाईल आणि त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी येणे अपेक्षित असताना ते आले नाहीत, तर किमान राज्यातील मंत्र्यांनी तरी येणे अपेक्षित होते मात्र एकही नेता मोर्चाला सामोरे आला नाही. त्यामुळे त्यांचा निषेध करीत असल्याचे चटप म्हणाले. यावेळी राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवती, श्रीनिवास खांदेवाले, सरोज काशीकर, नंदा पराते, अरुण केदार, धनंजय धार्मिक आदी विदर्भावादी नेते उपस्थित होते.