News Flash

उद्यापासून दोन दिवस बाजारपेठा बंद

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने गर्दीचे कारण पुढे करत सात मार्चपर्यंत शहरातील सर्व आठवडी बाजार बंद केले.

(संग्रहित छायाचित्र)

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला

नागपूर : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने  शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूर महापालिकेच्या समाज माध्यमावरील व्यासपीठावरून महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना उद्देशून नियम पाळण्याचे आणि करोनाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले. एक करोनाबाधित  गर्दीत गेला तर

२५ व्यक्तींना त्याचा संसर्ग होऊ  शकतो.

आपल्यामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात टाकणे योग्य नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टी, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर  हे नियम पाळावेच. पुढची दोन दिवस अतिआवश्यक सेवा सुरू राहतील, असेही महापौर म्हणाले. नागपुरात करोना रुग्णांची संख्या नियंत्रित असावी यासाठी महापालिका प्रशासन कठोर पावले उचलत आहे. उपद्रव शोध पथकाची चमू दिवसरात्र नियम मोडणाºयावर कारवाई करीत आहे. मात्र, कारवाई हा त्यावरील उपाय नसून नियम पाळणे आणि संसर्ग टाळणे अत्यावश्यक आहे. यासाठी काही नियम कडक केले आहेत. शनिवार आणि रविवारी कुणीही घराबाहेर निघू नये, अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दुकाने, मॉल, बाजार, थिएटर, नाट्यगृह, उपाहारगृह,  हॉटेल, रेस्टॉरेंट, सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये, कत्तलखाने, शहरातील मांस विक्रीची दुकाने सुरू राहणार नाहीत. कुटुंबासोबत दिवस घालवावा आणि करोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

‘मॉल सुरू, मग आठवडी बाजार का नाही?’

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने गर्दीचे कारण पुढे करत सात मार्चपर्यंत शहरातील सर्व आठवडी बाजार बंद केले. दुसरीकडे तेवढीच गर्दी होणाऱ्या बंदिस्त मॉल्सला मात्र रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. मॉल चालतो मग आठवडीबाजार का नाही, असा सवाल पथविक्रेत्याच्या संघटनेने (पथविक्रेता संघ) केला आहे. आठवडी बाजारात भाजी व इतर साहित्य विकणारे बसतात. त्यांचा उदरनिर्वाहच या व्यवसायावर असतो. त्यावर बंदी घालून महापालिका काय साध्य करणार आहे. गर्दी तर मॉल्समध्येही होते. तो बंदिस्त व वातानुकूलित असतो. तेथेही संसर्गाचा धोका आहेच. पण त्यांना परवानगी आणि मोकळ्या जागेवर भरणाऱ्याआठवडी बाजारावर बंदी.  एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना निर्बंधातून सूट तर फळे व भाज्या या जीवनावश्यक वस्तूंची विक्री होणाऱ्याआठवडी बाजारावर बंदी हा दुजाभाव आहे.  मागचे वर्ष व्यवसाय बुडीमुळे आर्थिकदृष्ट्या कठीण होते. त्यातून सावरत नाही तोच आता पुन्हा  पथविक्रे त्यांच्या व्यवसायावर गदा आणली आहे. याकडे पथविक्रेता संघटनेने महापालिकेला दिलेल्या निवेदनातून लक्ष वेधले आहे. अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात नागपूर जिल्हा पथविक्रेता संघ व आठवडी बाजार पथविक्रेता संघाचे जम्मू आनंद, शिरीष फुलझले, सुरेश गौर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा समावेश होता.

पुन्हा १८ मंगल कार्यालयांना दणका

नियम न पाळणारे शहरातील विविध मंगल कार्यालय, लॉनसह एकूण १८ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली तर १०६ ठिकाणी तपासणी करण्यात आली. या कारवाईत २ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. अग्रेसन भवन रविनगर, लेडिज क्लब सिव्हिील लाईन, प्रीतम काळे मेस अभ्यंकरनगर, मनोज सावरकर मॅरेज लॉन सावरकरनगर, शाहू रेस्टॉरंट बेसा रोड, विद्या वसानी हॉटेल, नंदी वाईन शॉप नरेंद्रनगर, गुरुदेव संस्कार भवन, हुडकेश्वरनगर, प्रल्हाद लॉन टेका नाका, शेर ए पंजाब लॉन ऑटोमोबाईल चौक, अदालत लॉन पाटनकर चौक, व्हाईट सभागृह व लॉन टेका नाका, ज.पी. सेलिब्रेशन हॉल जरीपटका, आबाद कम्युनिटी हॉल अनंतनगर, अमराई हॉल जाफरनगर, शिव किराणा शॉप नारा या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

३५१ अतिक्रमणांवर कारवाई

गुरुवारी ३५१ अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. आशीनगर भागात कारवाई करताना छोटे विक्रेत्यांनी विरोध केला. पथकातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना घेराव घालत कारवाई करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती होती. मात्र पोलिसांनी  विरोध करणाऱ्या४ विक्रेत्यांना ताब्यात घेतले.

हे परिसर बंद

हनुमानगर झोनमध्ये मीराबाई कोपरे व इतर गोविंदप्रभू नगर, हर्षा ताडमेघ शिवनगर, निवृत्ती कावळे, अयोध्यानगर मंगेश मैसाडकर वैदेही अपार्टमेंट, अभिनव श्रीवास लाडीकर ले आऊट, रेणुका मुरकुटे लाडीकर लेआऊट आणि गोदरेज आनंद टॉवर गणेशपेठ या ठिकाणी  रुग्ण असल्यामुळे हे क्षेत्र बंद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:46 am

Web Title: markets closed for two days from tomorrow akp 94
Next Stories
1 ‘आपली बस’ अखेर मेट्रोच्या हवाली!
2 करोना चाचण्यांबाबत तक्रारी वाढल्या
3 एकाच महिन्यात घरगुती सिलेंडरची तीन वेळा विक्रमी दरवाढ
Just Now!
X