23 July 2019

News Flash

गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा गजबजल्या 

शहराच्या विविध भागात मूर्तीची विक्री करणारे अनेक स्टॉल्स लागले असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ही विक्रीसाठी दिसत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मूर्तीच्या किमतीत २० टक्के वाढ

अवघ्या एक दिवसावर आलेल्या गणेशोत्सवासाठी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लगबग सुरू झाली असून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठाही गजबजल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्यासह गणपती मूर्तींच्या किंमतीमध्येही २० टक्के वाढ झाली आहे.

शहराच्या विविध भागात मूर्तीची विक्री करणारे अनेक स्टॉल्स लागले असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ही विक्रीसाठी दिसत आहेत. शाडू मातीच्या गणपतीची मूर्ती ५०० रुपयापासून ४० हजारांपर्यंत तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची किंमत ५०० रुपयांपासून २५ हजारांपर्यंत आहे. शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वाढ  झाली असल्याने यंदा किमान ५०० ते ६०० रुपयांनी मूर्तींच्या किमतीत वाढ झाली असल्याची माहिती मूर्तीकार प्रमोद सूर्यवंशी यांनी दिली.

थर्माकोल आणि प्लास्टिकचा उपयोग करू नका, असे आवाहन विविध पर्यावरणवादी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केले जात असले तरी बाजारात मात्र त्याची विक्री सुरूच आहे. गणपतीच्या मागे करण्यात  येणारी आरास ४०० रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत बाजारात उपलब्ध आहे. इतर वेळी ५० ते २०० रुपयाला मिळणाऱ्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या फुलाच्या माळा, तोरणे आता ३०० ते ५०० रुपयाला विकली जात आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिसचे फलक नाहीत

शहरातील चितारआळीत शहरासह विविध जिल्ह्य़ातून गणपतीची मूर्ती विक्री करणारे विक्रेते आले असल्याने त्या भागात राहणाऱ्या मूर्तिकारांना मूर्ती ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू मार्गावरही मोठय़ा प्रमाणात दुकाने उभारण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत तिथे तसे फलक लावण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र, शहरातील अनेक मूर्ती विक्रेत्यांनी  अजूनही हे फलक लावलेले नाहीत. मात्र तरीही महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याविरोधात कारवाई सुरू केली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on September 12, 2018 4:24 am

Web Title: markets welcome to ganaraya