नागपूर : एका व्यक्तीला त्यांच्या मुलीशी विवाह करण्याचे आमिष दाखवून कुटुंबाची ४१ लाख ५१ हजार रुपयांनी फसवणूक केली. ही घटना तहसील पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

चैतन्य प्रीतम मौदेकर, नेहा खोब्रागडे आणि अश्ताक भाई अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत टिमकी परिसरातील धनराज नागोराव टोपरे (५०) यांनी तक्रार दिली. आरोपी चैतन्य याने टोपरे यांच्या मुलीशी विवाह करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याशी कौटुंबिक संबंध निर्माण केले. स्वत: एका बँकेत अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर इतर आरोपींच्या मदतीने टोपरे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची रक्कम बँकेत मुदत ठेवीसाठी घेतली व परस्पर लंपास केली. सदनिकेचे विक्रीपत्र करून देण्याचेही आमिष दाखवले. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले. आतापर्यंत आरोपींनी संगनमताने टोपरे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांकडून ४१ लाख ५१ हजार ९० रुपये फसवणूक करून घेतले असून आता ते पसार झाले. आरोपींनी नोकरीचे दस्तावेज दिले असता त्यांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.