नागपूर : एका विवाहित महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत एका खेडय़ात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित २० वर्षीय तरुणी विवाहित असून प्रकृती ठीक नसल्याने काही महिन्यांपासून ती माहेरी आली होती. गेल्या १८ जूनला सायंकाळी ती मैत्रिणीकडून घरी परत येत असताना आरोपी दुचाकीने तिच्या पाठीमागून आले. तिला बळजबरीने दुचाकीवर नेऊन गावालगत असलेल्या नदीच्या काठावर आळीपाळीने बलात्कार केला.

त्यानंतर तिला तसेच सोडून पळून गेले. ती कशीबशी घरी आली व तिने आपल्या आईला सर्व हकिगत सांगितली. तिच्या आईने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. देवलापार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींना अटक करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.