लग्नाचे आमिष दाखवून एका घटस्फोटित महिलेला सोडल्याचा प्रकार हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष गणेश नागरीकर रा. घाटंजी, यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे.

पीडित २७ वर्षीय महिला चार वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती एकटीच राहते. दरम्यान, आरोपीशी तिची ओळख झाली. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली असून चार महिन्यांची गर्भवती आहे. आता आरोपी लग्नास नकार देत असून तिने पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कामठीत चिमुकलीवर अत्याचार

बलात्काराची दुसरी घटना नवीन कामठी परिसरातही उघडकीस आली. ११ वर्षीय पीडित मुलगी घरी असताना आरोपी अक्षय सुरेश बोरकर (२०) हा घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने आला. ती पाणी आणण्यासाठी घरात गेली असता आरोपी घरात शिरला व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो पळून गेला. हा प्रकार तिने आईला सांगितला. तिच्या आईने मुलीसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.