खड्डय़ांमुळे अपघातास जबाबदार असल्याचा आरोप

रस्त्यावरील खड्डय़ांमुळे एकाचा अपघात झाला. यात वाहनचालकाला दुखापत झाली. या अपघातासाठी प्रशासन जबाबदार असून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार गिट्टीखदान पोलीस ठाण्यांत देण्यात आली आहे.

पोलिसांनी तक्रार स्वीकारली असून त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. राजीव रंजन सिंग यांनी ही तक्रार दिली आहे. राजीव सिंग यांचे मित्र आजारी असल्याने ते त्याची चौकशी करण्यासाठी दुचाकीने फ्रेंण्ड्स कॉलनी परिसरातून जात होते. फ्रेंण्ड्स कॉलनीकडून स्मशानघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे नाहीत. शिवाय या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. अंधारात २० ते २५ किमी प्रतीतास वेगाने दुचाकी चालवत असतानाही एका खड्डय़ातून त्यांची गाडी उसळली व ते जमिनीवर कोसळले. यात त्यांच्या गुडघ्यासह शरीराला इजा झाली.  करदाता असतानाही प्रशासनाकडून सुविधा न पुरवल्याने व प्रशासनाच्या चुकीमुळेच रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ात अपघात झाल्याचे ते म्हणाले.

करदात्यांना सुविधा का नाही?

दरवर्षी नागपूरकरांवर लाखो रुपयांचे कर आकारले जातात. आता नवीन वाहन कायद्यानुसार दंडाची रक्कम मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना सुविधा पुरवणे आवश्यक आहे. या रस्त्यावर पथदिवे नसून मोठमोठे खड्डे आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळेच माझा अपघात झाला.  – राजीव रंजन सिंग.