महापौरांचा प्रस्ताव आयुक्तांनी फेटाळला

नागपूर : धंतोली विभागीय कार्यालयात कार्यरत कनिष्ठ अभियंता प्रफुल फरकासे यांना स्थायी समिती कार्यालयात काही दिवसांसाठी बोलावण्याचा महापौर संदीप जोशी यांचा प्रस्ताव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेटाळला आहे. या मुद्यावरून पुन्हा एकदा आयुक्त विरुद्ध महापौर असे चित्र महापालिकेत निर्माण झाले आहे.

फरकासे यांना अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेचा अनुभव आहे. सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे त्यांना स्थायी समितीत दहा दिवसांसाठी बोलावण्याचा महापौरांचा प्रस्ताव होता. फरकासे यांनी त्यांच्या सेवाकाळातील अनेक वर्षे स्थायी समिती कार्यालयातच घालवली. अर्थसंकल्प प्रक्रियेचा खडा न खडा माहिती असणाऱ्यांपैकी ते एक आहेत. मात्र मुंढे नागपुरात रुजू झाले व त्यांनी फरकासे यांची बदली धंतोली झोन कार्यालयात केली होती.

दरम्यान, फरकासे यांच्या बदलीमुळे स्थायी समितीचे अर्थसंकल्पाचे काम खोळंबले. स्थायी समिती अध्यक्षांना जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्यासाठी त्यांना फरकासे यांची मदत हवी आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी महापौरांना पत्र देऊन तशी मागणी केली.

महापौरांनी आयुक्तांना पत्र देऊन फरकासे यांना दहा दिवसांसाठी स्थायी समिती विभागात  पाठवावे, अशी विनंती केली. मात्र, आयुक्तांनी ही विनंती फेटाळून लावली. फरकसे यांचा अर्थसंकल्पाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांना स्थायी समिती कार्यालयात परत बोलावणे उचित ठरणार नाही, असे आयुक्तांनी महापौरांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे फरकासेच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आयुक्त व महापौर यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.