सुरक्षिततेबाबत साशंकता; शैक्षणिक संस्थांचा अनुभव

महिला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाव्यात, याविषयी बरेच उदात्त विचार व्यक्त केले जात असले तरी प्रत्यक्षात परिसर मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थिनी सुरक्षेच्या कारणास्तव नागपूरच्या बाहेर जाऊ इच्छित नाहीत. एकतर त्यांना पालकांचा विरोध होतो किंवा त्या स्वत:च बाहेर जाण्यास इच्छुक नसतात, असे एमबीए अभ्यासक्रमाच्या संस्थांचा अनुभव आहे. परिसर मुलाखतीत निवड होऊनही सुमारे १५ ते २० टक्के मुली राज्याबाहेर किंवा नागपूरच्या बाहेर जाण्याचे टाळतात.

एमबीए अभ्यासक्रम करायला येणाऱ्या मुली आधीच चांगल्या पगाराची, सुरक्षित ठिकाणी आणि मोठय़ा कंपनीत नोकरी करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रवेश घेतात. नागपुरात इंडोरमा, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा सारख्या मर्यादित कंपन्या असल्याने या विद्यार्थ्यांना जास्त संधी नाहीच. त्यातही या कंपन्या आयआयएमच्या विद्यार्थ्यांची निवड करतात. अशावेळी एमबीएच्या इतर संस्थांतील विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांची परिसर मुलाखतींद्वारे कंपन्यांनी निवड करावी, यासाठी संस्था, महाविद्यालये प्रयत्न करीत असतात. दत्ता मेघे व्यवस्थापन अभ्यास (डीएमआयएमएस) ही एमबीएतील नागपुरातील स्वायत्त संस्था असून यावर्षी संस्थेचा पहिलाच पदवीप्रदान समारंभ नुकताच पार पडला.

त्यांची पहिलीच तुकडी परिसर मुलाखतीला सामोरी गेली आणि त्यात संस्थेच्या ७३ टक्के विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीत रोजगाराच्या संधी मिळाल्या हे विशेष. त्यात अमेझॉन, अ‍ॅक्सिस बँक, अलेंबिक फार्मास्युटिकल्स, एचआयएल, कोलगेट पामोलिव, आयसीआयसीआय सेक्युरिटीज, एपएससी, जस्ट डायल, ओपीपीओ, व्हिवो, यालामनचिली आणि डी-मार्ट आदींचा समावेश होता.

एमबीएला येणाऱ्या बहुतेक मुलींना त्यांचे क्षेत्र माहिती असल्याने नोकऱ्याही कशाप्रकारच्या मिळतात, याचीही माहिती असतेच, पण तरीही दरवर्षी १५ ते २० टक्के मुलींचे पालक नोकरीसाठी त्यांना बाहेर पाठवण्यास उत्सुक नसतात. किंवा परिसर मुलाखतीच्या आधीच शिक्षकांना त्यांची नागपुरात किंवा ठरावीक शहरात काम करण्याची इच्छा व्यक्त करतात. याचा संस्था, कंपन्या आणि कधीकधी पालकांनी न पाठवल्याने त्या मुलींनाही मन:स्ताप सहन करावा लागतो अशी उदाहरणे आहेत.

मुली एमबीएला येतात तेव्हा त्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप आणि कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत हे माहिती असते. मात्र, १५ ते २० टक्के पालक किंवा विद्यार्थिनींच्या दरवर्षीच काही अटी असतात. पालक त्यांना नागपूरच्या बाहेर पाठवण्यास इच्छुक नसतात किंवा त्यांचे लग्न करून देण्यावरच त्यांचा भर असतो. काही मुली नागपूर, मुंबई, पुणे, बंगळुरू किंवा हैद्राबाद शहरांव्यतिरिक्त छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश किंवा बिहार या राज्यांमध्ये जाऊ इच्छित नाहीत. सुरक्षेच्या कारणास्तव मुली ‘फिल्ड वर्क’ किंवा सेल्ससारखी कामे करू इच्छित नाहीत, असाही अनुभव आहे. मात्र, तरीही पूर्वीच्या तुलनेत मुली बऱ्यापैकी बाहेर पडतआहेत, हे विशेष.

डॉ. शायनी चिब, संचालक, डीएमआयएमएस