पर्यवेक्षकांसह मेडिकलचे अधिकारीही हादरले

नागपूर : करोनामुळे लांबलेली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकची एमबीबीएसची परीक्षा सुरू आहे. मेडिकलमध्ये एमबीबीएस अंतिम वर्षांतील एक  विद्यार्थी बालरोग विषयाचा पेपर सोडवताना शिताफीने  गुगल व व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने उत्तरे लिहित असल्याचे पुढे आले. त्यामुळे येथील पर्यवेक्षकासह मेडिकलचे अधिकारीही हादरले. शेवटी हे प्रकरण आरोग्य विद्यापीठाला सुपूर्द करण्यात आले.

गेल्या आठवडय़ातही एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांनी हायटेक ‘कॉपी’ केल्याची चर्चा मेडिकलमध्ये सुरू होती. येथे बुधवारी  बालरोग विषयाचा लेखी पेपर सुरू असताना एका परीक्षार्थीला मुन्नाभाई स्टाईलने कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्याने अतिशय शिताफीने परीक्षा हॉलमध्ये मोबाईल नेला. गुगलवरून शोधून तो उत्तर लिहित होता. उत्तरे न सापडणाऱ्या प्रश्नांचे छायाचित्र त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर  मित्रांना पाठवून त्यांच्याकडून ती  मिळवणे सुरू केले.

हा प्रकार इतर  विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आला त्यांनी ही माहिती मेडिकलच्या एका अधिकाऱ्याला दिली. विद्यार्थ्यांवर  लक्ष ठेवले गेले. तो कॉपी करत असल्याचे स्पष्ट होताच त्याला पकडले. हे प्रकरण मेडिकलमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या सुपूर्द करून अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे वळते केले. मात्र त्यापूर्वीच हा सारा प्रकार नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यपीठात पोहचला होता. यामळे हे प्रकरण विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आले.