अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेकडून मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्सचा (एमसीए) अभ्यासक्रम बंद करण्याचे षडयंत्र सुरू असून हा अभ्यासक्रम पूर्ण करून आज अध्यापनाच्या क्षेत्रात असलेल्या प्राध्यापकांना महाविद्यालयांतूनच पायउतार केले जात असल्याने देशभरात संतापाची लाट असून येत्या १३ जूनपासून दिल्लीतील एआयसीटीईच्या कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचा अनुभव असलेल्या ज्योती झंवर यांनी थेट पंतप्रधानांकडे तक्रार करून होणाऱ्या अन्यायाची आपबिती कथन केली आहे.

आज अभियांत्रिकीच्या पदवीधरांपेक्षाही एमसीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, एमसीए, एम.टेक. असलेले प्राध्यापक बी.ई.च्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाहीत, असा फतवा काढून एआयसीटीईने आज राज्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांवर बेकारीची कु ऱ्हाड आणली आहे. आश्चर्य म्हणजे, एमसीए हा कौशल्यप्रधान अभ्यासक्रम आहे. एकीकडे ‘स्किल्ड इंडिया’ची हाक देत असताना दुसरीकडे असा ‘स्किलफुल’ अभ्यासक्रम बंद पाडण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे.  व्यावसायिक अभ्यासक्रमांची सर्वात जास्त महाविद्यालये आणि जागा अभियांत्रिकीच्या आहेत. त्यात ४० आणि ४५ टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो. शिवाय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेले वलय लक्षात घेता विद्यार्थी एमसीए करण्यापेक्षा अभियांत्रिकीची पदवी पदरात पाडून घेण्याचाच प्रयत्न करतो. मात्र, अभियांत्रिकीच्या रिक्त राहणाऱ्या जागा दरवर्षी हजारोंच्या संख्येने असून या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना नियमित पुरवठा होत रहावा म्हणून इतर अभ्यासक्रमच बंद पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यासंदर्भात ज्योती झंवर म्हणाल्या, एमसीए हा कौशल्यप्रधान अभ्यासक्रम आहे. उद्योगांमध्ये त्याला मोठी मागणी असते. दरवर्षी शेकडो अभियंत्यांची निर्मिती होते. मात्र, त्यापैकी केवळ २० टक्के अभियंत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्या तुलनेत ७० टक्के एमसीए, एम.टेक. झालेल्यांना रोजगार उपलब्ध होतो. असे असतानाही एमसीएचा अभ्यासक्रम बंद केला जात आहे. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पहिल्या दहामध्ये येणाऱ्या महाविद्यालयातील एमसीएचे अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहेत.

स्मृती इराणी लक्ष घालणार

पाच ते २० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेले एमसीए, एम.एस्सी. आणि एम.टेक. झालेल्या ५,००० प्राध्यापकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. मनुष्यबळ विकासमंत्री आणि अधिकारी एस.एस. संधु यासंदर्भातील तक्रारीत लक्ष घालत आहेत. अखिल भारतीय पदव्युत्तर संघटनेचे अध्यक्ष वामशी कृष्णा राजा आणि इतर दोन संघटनांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याशी बुधवारी या विषयावर विजयवाडा येथे चर्चा केली असून त्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.