आरोग्य विज्ञान विद्यापीठ मंडळाचे सदस्य डॉ. संजीव चौधरी यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) नवीन निकषानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांची संख्या कमी होत आहे, तर दुसरीकडे येथे प्रत्येक वर्षी रुग्ण वाढून डॉक्टरांवर कामाचा भार वाढत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने येथील पदव्युत्तर विद्यार्थ्यांमधील मानसिक ताण कमी करण्यासाठी दोन्ही अडचणीतून मध्यममार्ग शोधला पाहिजे, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

डॉ. चौधरी म्हणाले, नागपूरच्या मेडिकल, मेयोसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत प्रत्येक वर्षी रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईसह इतर भागातील महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे येथे डॉक्टरांवर ताण वाढला आहे. या डॉक्टरांकडून एकही लहान चूक झाल्यास ती रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे युनिट प्रमुख त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या डॉक्टरांवर संतापत असतात. उद्देश चुकीचा नसतो. परंतु काही डॉक्टरांनी हे संतापणे मनावर घेतल्याने आत्महत्यासारख्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही एमसीआयने मध्यममार्ग काढण्याची गरज आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास  राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत सेवा देणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांसह पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांवरील ताण कमी होईल. सोबत डॉक्टर वाढल्याने रुग्णांना वेळीच हाताळणे शक्य होईल. परिणामी तक्रारी कमी होतील, याकडे डॉ. चौधरी यांनी लक्ष वेधले.

हेटको प्रकल्पाद्वारे ग्रामीण महिलांचे समुपदेशन

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. हाडे ठिसूळ होण्याची व्याधी वाढते. ऑस्टिओपोरेसिसचा त्रास वाढला की, साध्या दडपणानेही हाड मोडले जाते. जड वस्तू उचलल्यानेदेखील हाड मोडण्याची दाट शक्?यता असते. परंतु शरीरात ही लक्षणे दिसत नाहीत. गुडघा, पाठीचा कणा, कंबरेच्या हाडांचे दुखणे वाढत नाही, तोपर्यंत या व्याधीचा थांगपत्ता लागत नाही. विदर्भात हे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या आजाराचे धोके महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझ्या रुग्णालयात एक स्टुडिओ तयार केला आहे. येथे बसून गावखेडय़ातील महिलांशी ‘टेलिकन्सल्टेशन’द्वारे संवाद साधतो. या प्रकल्पाअंतर्गत संबंधित इंटरनेट असलेल्या गावात वैद्यकीय चमूकडून एक कॅमेरा लावला जातो. तेथे हाडे ठिसूळ होण्याच्या व्याधीबद्धल महिलांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले जाते. या उपक्रमाला ‘हेल्थ एज्युकेशन अ‍ॅण्ड टेलिकन्सल्टेशन ऑन ऑस्टिओपोरेसिस’ (हेटको) असे नाव देण्यात आले आहे. हा देशातील पहिला उपक्रम असून या पद्धतीचे उपक्रम विद्यापीठाने राबवल्यास राज्यातील लक्षावधी रुग्णांना लाभ होणे शक्य आहे, असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.