‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाऊल

नागपूरशहरातील अपघातप्रवण स्थळांमध्ये वाढ होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. पण आता अपघातप्रवण स्थळे कमी करण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात होत असून राजभवन चौक आणि एलएडी चौकात उपाययोजना करण्यासाठी नुकतीच पाहणी करण्यात आली.

शहरात मेट्रो, उड्डाणपूल आणि सिमेंट रस्त्यांचे बांधकाम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्याशिवाय जलवाहिन्या, भूमिगत वीजवाहिनी आणि केबल टाकण्यासाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यात येत असल्याने ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत असून लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी दहापेक्षा अधिक अपघात आणि तीन जणांचा मृत्यू झाला असेल तर त्या स्थळाला अपघातप्रवण स्थळ जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी शहरातील अनेक स्थळांचा अभ्यास करून शहरात चाळीसवर अपघातप्रवण स्थळ जाहीर करण्यात आले. यासंदर्भात लोकसत्ताने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघातप्रवण स्थळे कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले असून नुकतीच राजभवन आणि एलएडी चौकाची पाहणी केली. ही पाहणी करताना सदर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस उपस्थित होते. येत्या आठ ते दहा दिवसांत अपघातप्रवण स्थळ मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल देशमुख यांनी दिली.

दोन्ही चौकात १५ जणांचा मृत्यू

सेमिनरी हिल्सवरील एलएडी चौकात गेल्या तीन वर्षांत सात अपघात झाले असून त्यात ७ जणांचा मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले.  राजभवन चौकात आठ अपघातांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. दोन्ही ठिकाणी गेल्या तीन वर्षांत १५ जणांचा मृत्यू झाल्याने ते अपघातप्रवण स्थळ जाहीर करण्यात आले.

वेग कमी करण्याची गरज

या दोन्ही ठिकाणी अनेक रस्ते एकत्र मिळतात. शिवाय काही वळण आंधळे असून समोरून येणारे वाहन दिसत नाही. अशा ठिकाणी भरधाव वाहने समोरासमोर आल्यास अपघात होतात. त्यामुळे येथे वाहनांचा वेग कमी होईल अशी उपाययोजना करण्यात येणार आहे. रात्रीच्या अंधारात चमकणारे ब्लिनकर्स बसवण्यात येतील. तसेच पांढरे पट्टे लावण्यात येणार आहेत. गतिरोधक बसवण्याचा विचारही सुरू आहे.