*   मेडिकल, मेयो, दंतमध्ये चाचणीच नाही *   विद्यार्थिनीच्या आत्महत्येने प्रश्न ऐरणीवर

वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रत्येक पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या मानसिक चाचणीचे आदेश दिले असतानाही बहुतांश महाविद्यालयांनी त्याला हरताळ फासला आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयोसह दंतच्या विद्यार्थ्यांच्याही अद्याप अशा चाचण्या घेण्यात आल्या नसून त्यामुळे विद्यार्थ्यांमधील नैराश्य शोधून त्यांच्या आत्महत्यांवर नियंत्रण मिळणार कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यात नागपूरच्या मेडिकल व मेयोसह तब्बल १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये असून मोठय़ा प्रमाणावर खासगी वैद्यकीय महाविद्यालयेही आहेत. प्रत्येक संस्थेकडून परिचारिका, बीपीएमटीसह इतरही वैद्यकीयशी संबंधित अभ्यासक्रम शिकविले जातात. येथे प्रत्येक वर्षी विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना घडल्या आहेत.

त्या टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यातच विद्यार्थ्यांमधील नैराश्य दूर करण्यासाठी २०१४- १५ च्या दरम्यान प्रत्येक पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांची दर वर्षी मानसिक आरोग्य चाचणी करण्याचे आदेश वैद्यकीय महाविद्यालयांना दिले होते. अशा प्रकारच्या चाचण्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिसून आल्यास संस्थांकडून त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. परंतु नागपूरच्या मेडिकल, मेयो, दंतसह बहुतांश शासकीय व खासगी संस्थांकडून या आदेशाला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसत आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये सुमारे ४१० निवासी डॉक्टर असून त्यात नवीन शैक्षणिक सत्रापासून ३४ ने वाढ होणार आहे. परंतु येथील निवासी डॉक्टरांच्या मार्डकडून अद्याप एकाही विद्यार्थ्यांची चाचणी झाली नसल्याचे सांगितल्या जात आहे तर मेयोतही १८० च्या जवळपास निवासी डॉक्टर असून त्यांच्याही चाचण्या झाल्या नाही, अशी माहिती आहे.

नागपूरच्या मेडिकलमध्ये व्यवसायोपचार विभागाच्या एका द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनीने मंगळवारी (५ एप्रिल) सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्यावर पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ही विद्यार्थी पदव्युत्तरची नसली तरी पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही ही चाचणी घेण्याची गरज या घटनेतून पुढे येत आहे. शासनाकडून या विषयाला गांभीर्याने घेत या चाचण्या न घेणाऱ्या महाविद्यालयातील प्रशासनावर काही कारवाई केली जाणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विषयावर मेडिकल प्रशासनाकडून मात्र चाचण्या घेतल्याचा दावा केला जात आहे, हे विशेष.

आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी समिती

मेडिकलच्या व्यवसायोपचार विभागातील द्वितीय वर्षांची विद्यार्थिनी करिश्मा राऊत हिच्या आत्महत्येचे कारण शोधण्याकरिता मेडिकल प्रशासनाने बुधवारी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

समितीमध्ये व्यवसायोपचार विभागाच्या प्राचार्या डॉ. सोफिया आझाद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ यांच्यासह इतर एका सदस्याचा समावेश आहे. समितीला विद्यार्थिनीच्या मैत्रिणी वसतिगृहातील इतर मुलींसोबत तिची वागणूक आणि नातेवाईकांना भेटून त्यांची बयाण नोंदवायचे आहे. करिश्माला वसतिगृहात त्रास होता का?, तेथे सुविधांचा अभाव आहे काय?  यासह इतरही बाबींची माहिती घेऊन समितीला मेडिकल प्रशासनाला अहवाल सादर करायचा आहे. समितीचे काम गुरुवारपासून सुरू होईल. दरम्यान, मेडिकल प्रसासनाने बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाला या प्रकरणाचा अहवाल पाठवण्यात आला. महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठालाही हा अहवाल पाठवला जाणार असून चौकशीनंतरच मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल. मुलीने आत्महत्या करण्याच्या दहा मिनिटापूर्वीच इतर मुलींशी चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, बुधवारी करिश्माचे मेडिकलमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवले.

चाचणी गरजेची

प्रत्येक विद्यार्थ्यांची मानसोपचार चाचणी केल्यास त्यांच्यातील नैराश्य व त्याचे कारण कळू शकते. या विद्यार्थ्यांवर योग्य समूपदेशनासह उपचाराने मोठी घटना टाळता येते. मेयोतील मानसोपचार विभागाला अद्याप या सूचना नसून त्या मिळताच तातडीने विद्यार्थ्यांच्या चाचण्या केल्या जाईल.

– डॉ. प्रवीर वराडकर, मानसोपचार विभागप्रमुख, मेयो.