29 March 2020

News Flash

वैद्यकीय महाविद्यालयांचा लेखाजोखा आता संकेतस्थळावर

* एकच शिक्षक दोन संस्थेत दाखवणाऱ्यांना चाप * भारतीय वैद्यक परिषदेचा प्रयत्न

* एकच शिक्षक दोन संस्थेत दाखवणाऱ्यांना चाप * भारतीय वैद्यक परिषदेचा प्रयत्न

देशभरातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत एकच शिक्षक दोन वा त्याहून जास्त ठिकाणी दाखवण्यासह इतरही अनेक गैरप्रकार  उघडकीस आले आहेत. असे प्रकार थांबवण्याकरिता ‘एमसीआय’कडून प्रत्येक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती संकेतस्थळावर टाकण्याचा निर्णय झाला आहे. या प्रक्रियेवर चार सदस्यीय उच्च समितीचे लक्ष राहणार असल्याने सगळ्या संस्थांची बनवाबनवी थांबण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

भारतीय वैद्यक परिषदेच्या (एमसीआय)अखत्यारीत देशभरातील सुमारे ४४० व राज्यातील ४४ शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये येतात. ‘एमसीआय’कडून वैद्यकीय महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या मान्यतेबाबत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्री अध्यक्ष असलेल्या या समितीत एक सेवानिवृत्त न्यायाधीश, ‘एमसीआय’चा एक सदस्य व एक वरिष्ठ डॉक्टर प्रतिनिधींचा समावेश आहे. ही समिती ‘एमसीआय’कडून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या नवीन महाविद्यालयांना मंजुरीसह विविध महत्त्वाच्या कामांवर लक्ष ठेवते.

समितीच्या सूचनेवरून ‘एमसीआय’ने देशातील प्रत्येक वैद्यकीय संस्थेला तेथे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी माहिती मागितली आहे. ही सगळी माहिती ‘एमसीआय’च्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे. नागपूरच्या मेयो व मेडिकलसह इतर संस्थांकडून ही माहिती मागवणारे पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रानुसार प्रत्येक संस्थेला त्यांच्याकडे काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ते रुजू झाल्याची तारीख, त्यांचा अनुभव, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेसह इतरही माहिती त्वरित ‘एमसीआय’कडे पाठवायची आहे. संस्थेला उपलब्ध असलेल्या पदव्युत्तरच्या जागेसह इतरही माहिती ‘एमसीआय’कडून संकेतस्थळावर अपलोड होणार आहे.

प्रत्येक माहिती पारदर्शकपणे संकेतस्थळावर टाकली जाणार असल्याने वेगवेगळ्या राज्य सरकारांसह खासगी संस्थांकडून एकच शिक्षक दोन संस्थांमध्ये दाखवण्याची बनवाबनवी पूर्णपणे संपुष्टात येण्याची आशा वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयबाबतही एकाच शिक्षकाच्या बदल्या दाखवल्या गेल्याचे प्रकरण पुढे आले होते. एमसीआयने सुरू केलेल्या नवीन योजनेचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून स्वागत केले जात आहे.

देशातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षकांसह अभ्यासक्रम नसतांनाही त्यांच्या संकेतस्थळावर चुकीचे वैद्यकीय पदवी व पदविका अभ्यासक्रम दाखवून विद्यार्थ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रवेशाच्या नावाने पैसे उकळण्यात आल्याचा प्रकार पुढे आला होता. एमसीआय मागवत असलेल्या या माहितीनंतर हा प्रकार करणाऱ्या प्रत्येक संस्थेची माहिती उघड होणार आहे.

‘एमसीआय’ने नवीन पद्धतीनुसार नागपूरच्या ‘मेडिकल’ला मागितलेली माहिती लवकरच पाठवली जाईल. शासकीय संस्थांमध्ये कोणतीही चुकीची कामे होत नसल्याने त्याचा राज्यभरातील या संस्थांवर परिणाम होणार नाही. परंतु, चुकीचे अभ्यासक्रम व शिक्षक दाखवणाऱ्या काही खासगी संस्था अडचणीत येण्याची शक्यता नकारता येत नाही.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2016 2:20 am

Web Title: medical colleges to update on website
Next Stories
1 देशातील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना आता समान शिष्यवृत्ती
2 नागपूर मेट्रो रेल्वेला देशभरातील रेल्वे तंत्रज्ञांचे सहकार्य
3 कार्बन डायऑक्साईड शोषणाऱ्या झाडांची लागवड बंद
Just Now!
X