एमएसच्या ११२ च्या तुलनेत बधिरीकरण तज्ज्ञांच्या केवळ ५ जागा वाढल्या

भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) नागपूरच्या मेडिकल- मेयोसह राज्यभरातील पदव्युत्तरच्या १९१ जागा वाढवल्याने व त्यात शस्त्रक्रियेशी संबिंधत विविध विषयांच्या ११२ जागांचा समावेश असल्याने सगळ्याच शासकीय संस्थांमधील शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी संपुष्टात येण्याची आशा व्यक्त होत होती, परंतु शस्त्रक्रियेला आवश्यक बधिरीकरणाच्या केवळ ५ जागा वाढल्याने शस्त्रक्रियांना विलंबच लागणार असल्याने सामान्य रुग्णांची प्रतीक्षा कायम राहण्याची शक्यता आहे.

भारतात लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यातच पदवीच्या तुलनेत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागाही फार कमी आहेत. या प्रकारामुळे काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून अव्वाच्या सव्वा देणगीसह शुल्क आकारून वैद्यकीय अभ्यासक्रमास इच्छुक विद्यार्थ्यांची लूट केली जाते. खासगीचे शुल्क भरणे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शक्य नसल्याने त्यांचा केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिकण्याकडे कल असतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेवरून एमसीआयने पदव्युत्तर जागांची संख्या वाढवण्याकरिता प्रत्येक शिक्षकांमागील विद्यार्थ्यांची संख्या वाढवत तसे प्रस्ताव शासकीय संस्थांकडून घेतले.

२८ मार्च २०१७ मध्ये सत्र २०१७-१८ करिता नागपूरच्या मेडिकल ३४, मेयो २०, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय (सायन, मुंबई) १५, सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज (मुंबई) १०, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (मुंबई) १२, ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज (मुंबई) २९, एसआरटीआर मेडिकल कॉलेज (अंबेजोगाई) २, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या मिरज १३, लातूर ३, औरंगाबाद १४, अकोला ६, नांदेड २१, डॉ. व्यशंपयान मेमोरियल मेडिकल कॉलेज (सोलापूर) १, बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) ९ जागा वाढवण्याला मंजुरी मिळाली. एकूण १९१ जागांत शस्त्रक्रियेशी संबंधित एमएसच्या ११२ जागांचा समावेश आहे. नागपूरच्या मेडिकल- मेयोसह सगळ्या रुग्णालयांतील हाडरोग विभागासह इतर अनेक विभागात डॉक्टरांची संख्या वाढून शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेतील रुग्णांची यादी संपुष्टात येण्याची आशा होती, परंतु शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक बधिरीकरण विषयाचे केवळ ५ डॉक्टर मिळणार असल्याने रुग्णांचा त्रास कायम राहणार आहे.

राज्यात वैद्यकीय शिक्षण विभाग असो की सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वत्र शस्त्रक्रिया करणाऱ्या पदव्युत्तर डॉक्टरांची संख्या कमी आहे. तेव्हा या जागा एमसीआयने वाढवल्याने भविष्यात राज्यातील रुग्णांना लाभ होईल, परंतु शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना बधिरीकरणासाठी आवश्यक जागा वाढवण्याची गरज असून त्यामुळे सगळ्या संस्थांतील शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना लाभ शक्य आहे.  डॉ. प्रमोद रक्षमवार, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना.