महेश बोकडे

मेडिकल, मेयोच्या रुग्णांना मन:स्ताप

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयात रुग्णांना विशिष्ट आहार मिळावा म्हणून धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षण खात्याने त्यांच्या अखत्यारित येत असलेल्या नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयांमध्ये रुग्णांना मांसाहारासह इतर आहार मिळत नाही. त्यामुळे या खात्यानेही आरोग्य खात्याप्रमाणे धोरण तयार करावे, अशी मागणी आहे.

उपराजधानीत सार्वजनिक आरोग्य विभागाचे डागा, मनोरुग्णालय असून वैद्यकीय शिक्षण खात्याची मेडिकल, मेयो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र आदी रुग्णालये आहेत. येथे राज्य कामगार विमा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, एम्स या वैद्यकीय शिक्षण संस्था आहेत. एम्स आणि दंत वगळता सर्वत्र रुग्णांना दाखल करण्याची सोय असून महापालिकेच्या इंदिरा गांधी, सुतिकागृह, आयसोलेशन या रुग्णालयांतही उपचारासाठी १३१ खाटा उपलब्ध आहेत. येथील रुग्णांना दिला जाणारा आहारही उपचाराचा एक महत्त्वाचा घटक असतो. परंतु शहरातील सर्वच शासकीय रुग्णालयांत आहारातून मांसाहार बंद केले.

आरोग्य विभागाने रुग्णांना पोषक आहार मिळावा म्हणून त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी नवीन आहार धोरण तयार केले. परंतु अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेडिकल, मेयो, आयुर्वेद या रुग्णालयांमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धतीने तयार तक्तयानुसार रुग्णांना भोजन  दिले जाते. त्यातही मांसाहार व फळांना कात्री लावण्यात आली आहे. वास्तविक गंभीर गटातील रुग्णांच्या भोजनाकडे लक्ष देण्याची गरज आहार तज्ज्ञ विशद करतात. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याने आरोग्य खात्याप्रमाणे आहार धोरण तयार करावे, अशी मागणी आहे.

यासंदर्भात वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

बालपणापासून पोषक आहार घेणाऱ्याची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते. रुग्णाला योग्य आहार दिल्यास तो लवकर बरा होतो. वैद्यकीय शिक्षण खात्याने या गोष्टीवर जातीने लक्ष देऊन सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी नवीन आहार धोरण तयार करण्याची गरज आहे.’’

– डॉ. उदय बोधनकर, अध्यक्ष, कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड डिसॅबिलिटी (कोमहाड).